श्रीलंकेत होणार माता सीतेचे भव्य मंदिर
मूर्तीची प्रतिष्ठापना होणार शरयू नदीच्या जलाद्वारे
कोलंबो
अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता श्रीलंकेत माता सीतेचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. येथे सीतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येतील शरयू नदीच्या जलाद्वारे केली जाणार आहे.श्रीलंकेतील सीता अम्मन मंदिर प्रशासनाने यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून मंदिरासाठी शरयू नदीचे पाणी मिळावे अशी विनंती करणारे पत्रही पाठवले आहे.
श्रीलंकेतील मंदिर प्रशासनाचे एक पथक आता १५ मे रोजी जल घेण्यासाठी भारतात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी २१ लिटर शरयू जल उपलब्ध करून देण्याचे निर्देश अयोध्या तीर्थ विकास परिषदेला दिले आहेत. आम्ही एका कलशात ते पवित्र जल त्यांना देणार असल्याचे परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितले. ही प्रक्रिया १९ मे रोजी होणार असून मंदिराच्या इतिहासात ही एक ऐतिहासिक घटना असेल असे त्यांनी म्हटले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले सीता अम्मन मंदिराच्या प्रतिनिधी मंडळाची इच्छा होती की शरयूचे जे पाणी ते श्रीलंकेला नेणार आहे ते अगोदर रामललाच्या दरबारात ठेवले जावे. रामललांचा जन्म तर शरयू नदीच्या किनारीच झाला आहे. माता शरयू अगोदर आली व प्रभू श्रीरामांचा जन्म नंतर झाला आहे. प्रभू रामाच्या जन्माच्या अगोदरपासून माता शरयू अयोध्येत विराजमान आहे. आता शरयूचे हे जल दोन देशांतील लोकांचे मने जोडण्याचे काम करेल.
या समारोहासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानील विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्धनेही उपस्थित राहणार आहेत. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. श्रीलंकेच्या नुवारा एलियाच्या पहाडांमध्ये माता सीतीचे मंदिर आहे. रामायणात ज्या अशोक वाटिकेचा उल्लेख आढळतो ते ठिकाण हेच आहे असे मानले जाते. अशोक वाटिकेतच रावणाने माता सीतेला कैदेत ठेवले होते. याच सीता अम्मन मंदिराजवळ रामभक्त हनुमानाच्या उपस्थितीचे पुरावेही आढळून येतात असे सांगितले जाते
