वर्षा गायकवाड यांना उमेदवारी
काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून संधी
मुंबई : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह नसीम खान, राज बब्बर हे नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु विजयी समीकरणे डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्यमधून तिकीट जाहीर केले आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळाला, तरी या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला नव्हता. या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू होती. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन आणि विजयी समीकरणे डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे या मतदारसंघातून अद्यापही भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नाही.
वर्षा गायकवाड या परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि जिथे त्यांची ताकद आहे त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी दिल्लीवारीही केली होकती. परंतु मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. शिवसेनेने ‘दक्षिण मध्य’मधून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करत आपली खदखद त्यांच्यापुढे मांडली. परंतु उमेदवार जाहीर केला असल्याने आता तडजोड शक्य नसल्याचे ठाकरेंनी सांगितल्यावर वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून ‘उत्तर मध्य’मधून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले.
मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील एकूण १३ मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे; परंतु यातील बहुतांश मतदारसंघांचे उमेदवारच अद्याप निश्चित झालेले नाहीत. एकट्या मुंबईतील जवळपास चार मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा झालेली नाही
