1 मेपासून देशात काय बदलणार
खासगी बँका ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल
नवी दिल्ली
लवकरच मे महिना सुरू होत आहे.या महिन्यात काही बँकांचे तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांविषयीचे नियम आणि सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत.
साहजिक या बदलांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे.
सहा दिवसांनी मे महिना सुरू होत आहे. 1 मे पासून देशात अनेक बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल. खासगी बँकांपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल होत आहे. तसेच गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील बदल होईल.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या सुधारित किमती जाहीर होतात. ऑइल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. यासोबत सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील निश्चित होतात. मे महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कॅबिनेटच्या निर्णयानुसार, आता महत्त्वाच्या कागदपत्रांवर आईचं नाव अनिवार्य असेल. हा निर्णय 1 मे 2024 पासून लागू होत आहे. या कागदपत्रांमध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र, शालेय दस्तऐवज, मालमत्तेची कागदपत्रं, आधार कार्ड आणि पॅन कार्डसारख्या आवश्यक शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव असणं अनिवार्य असेल.
1 मे पासून जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरातील भस्म आरतीसाठीच्या बुकिंगमध्ये बदल होत आहे. आता मंदिर समितीने मंदिरात भस्म आरतीचे बुकिंग 1 मेपासून तीन महिने अगोदर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हे बुकिंग 15 दिवस अगोदर करता येत होते.यामुळे भाविकांना तीन महिने अगोदर बुकिंग करता येईल. तसेच भाविक फक्त एक मोबाईल क्रमांक आणि एक आधार कार्ड वापरून तीन महिन्यात एक बुकिंग करू शकतील.
आयडीएफसी फर्स्ट बँक 1 मेपासून काही नियमांत बदल करत आहे. एक तारखेपासून तुम्ही जर आयडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युटिलिटी बिल भरले तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. बँकेने यासाठीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात वीज बिल, गॅस, इंटरनेट, केबल सर्व्हिस आणि पाणीपट्टीसह अन्य बिलांचा समावेश असेल. हा नियम फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड, एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड सारख्या कार्डवर लागू नसेल.आयसीआयसीआय बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे नवीन चार्जेस 1 मेपासून लागू होतील. एक तारखेपासून शहरी भागातील ग्राहकांना डेबिट कार्डच्या वार्षिक फी पोटी 200 रुपये तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 99 रुपये द्यावे लागतील.
खासगी क्षेत्रातील येस बँकेने 1 मेपासून सेव्हिंग अकाउंटशी संबंधित अनेक सेवांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक मिनिमम अॅव्हरेज बॅलन्सच्या नियमात बदल करत आहे. तसेच अकाउंट प्रो मॅक्ससाठी सरासरी बॅलन्स 50 हजार रुपये अनिवार्य असेल.
