अंतराळात गूढ रेडिओ सिग्नल
जगभरातील खगोलशास्त्रज्ञ गोंधळात
वॉशिंग्टन
अंतराळातून येणाऱ्या एका गूढ रेडिओ सिग्नलने जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांना गोंधळात टाकलं आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन डॉट कॉम’ने अलीकडेच एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालातल्या माहितीनुसार, अलीकडेच खगोलशास्त्रज्ञ अशा रेडिओ सिग्नलपर्यंत पोहोचले आहेत, जे त्यांनी याआधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, हे खूप आश्चर्यकारक आहे. या मधूनमधून येणाऱ्या आवाजाचं संपूर्ण चक्र सुमारे एक तासाभराच्या कालावधीचं आहे.
अहवालात या विचित्र आवाजांबद्दल अधिक माहिती देताना सांगण्यात आलं आहे, की कधी कधी हा आवाज लांबलचक ट्यूनसारखा असतो तर कधी त्याच्या तीव्रतेत अचानक वाढ होते. कधी हा आवाज खूप कर्कश असतो, तर कधी तो कमकुवत तरंग निर्माण करतो. काही वेळा आवाजाच्या या चक्रात निरव शांतता पसरते अंतराळवीरांचं म्हणणं आहे, की नेमकं काय घडत आहे याबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. हा एक असामान्य न्यूट्रॉन तारादेखील असू शकतो. शिवाय, इतर शक्यताही नाकारता येणार नाहीत.काही काळापूर्वी, ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइटच्या मदतीने, नासाच्या आंतरराष्ट्रीय टीमने पृथ्वीपासून सुमारे 40 प्रकाशवर्षं दूर असलेल्या एका नवीन ग्रहाचा शोध लावला होता. त्याचा आकार आणि वातावरण पृथ्वीसारखंच आहे. आतापर्यंत शोधलेल्या कोणत्याही राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेटपैकी हा ग्रह पृथ्वीशी सर्वांत जास्त साधर्म्य दाखवणारा आहे. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक जर्नलमध्ये याबाबत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
