१७ वर्षीय डी. गुकेशने रचला इतिहास


विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
नवी दिल्ली
भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तसेच डी. गुकेश ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ही स्पर्धा जिंकून त्याने जगज्जेत्या डिंग लिरेनला (चिनी ग्रँडमास्टर) आव्हान दिलं आहे. यावर्षीच्या अखेरीस डी. गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सामना खेळवला जाईल. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी ही स्पर्धा (कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट) आयोजित केली जाते. डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.
कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराविरोधातील अंतिम सामना अनिर्णित राखला. स्पर्धेत तो १४ पैकी ९ गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. यासह त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली असून तीन दशकांपासूनचा रशियन बुद्धीबळपटू कास्परोव्हचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. १९८४ च्या कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत रशियन ग्रँडमास्टर कास्परोव्हने वयाच्या २२ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळची स्पर्धा जिंकून कास्परोव्हने त्याचाच देशबांधव जगज्जेत्या कारपोव्हला आव्हान दिलं होतं.
दरम्यान, या विजयानंतर गुकेश म्हणाला, मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोनिआचमधील रोमांचक सामना पाहत होतो. त्याचा मला अंतिम सामन्यात फायदा झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!