गरोदर पत्नीला जिवंत जाळलं
पोटात होती जुळी मुलं
चंदिगढ
माणसं रागाच्या भरात अनेकदा अशी कृत्य करतात की त्यांच्या कृत्याला नक्की काय म्हणायचं असा प्रश्न पडतो. पंजाबमध्ये असाच भयंकर प्रकार घडला आला आहे. एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती, मात्र हे कृत्य करताना त्या कोवळ्या जीवांचा विचारही या माणसाच्या मनाला शिवला नाही.पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रईया भागात बुलेड नंगल गावात ही घटना घडली आहे. सुखदेव असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे. त्याच्या पत्नीचं नाव पिंकी असं होतं. त्या दोघांची सतत भांडणं होत असत. पिंकी सहा महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती. मात्र, सुखदेवने केलेल्या कृत्यामुळे या जगात येण्याआधीच आईसह त्या बाळांचा करुण अंत झाला.
सुखदेव आणि पिंकी यांचं शुक्रवारी जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्याचं पर्यवसान हिंसेत झालं. सुखदेव याने पिंकीला बेडला बांधलं आणि बेडसह तिला जाळून टाकलं. आगीच्या ज्वाळांनी घेरलेल्या पिंकीच्या किंचाळ्या ऐकून सगळा परिसर स्तब्ध झाला. मात्र सुखदेवच्या मनाला पाझर फुटला नाही. खूप जास्त भाजल्यामुळे पिंकीचा मृत्यू झाला. हे कृत्य केल्यानंतर सुखदेव फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही, मात्र पोलिस त्याचा शोध घेत आहेत
