विश्वास वसेकर यांनी कवितेचा पॅटर्न बदलला – विनोद कुलकर्णी


‘ अडीच अक्षरी कविता ‘ चे साताऱ्यात लोकार्पण सोहळा
सातारा
व्यवस्थेविरुद्ध बोलला तरच ती कविता ठरते याला छेद देऊन प्राध्यापक, कविवर्य विश्वास वसेकर यांनी कवितेचा पॅटर्न बदललेला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फेदीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात कविवर्य प्रा. विश्वास वसेकर यांच्या ‘ अडीच अक्षरी कविता ‘ या कवितासंग्रहाचा लोकार्पण सोहळा व प्राध्यापक विश्वास वसेकर यांच्या साहित्यावर चर्चा हा कार्यक्रम संपन्न झाला. वसेकर यांच्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे हे होते. यावेळी वसेकर यांच्या साहित्यावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, लेखिका व पर्यावरण तज्ञ ऍडव्होकेट सिमंतीनी नूलकर, लेखक डॉ. संदीप श्रोत्री, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी पुढे म्हणाले, प्राध्यापक विश्वास वसेकर यांनी कदाचित स्वतः प्रेम केले असेल त्याचा अनुभव त्यांनी अडीच अक्षरी कविता या पुस्तकात लिहिलेला आहे. सातारा या ठिकाणी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी साडेतीन दिवस तुम्ही संमेलनासाठी या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्रीकांत कात्रे म्हणाले, साहित्याच्या क्षेत्रात संपन्न असे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक वसेकर हे आहेत. ९९ वे साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे त्याच वेळेस वसेकर या ठिकाणी आले आहेत हा दुग्ध शर्करा योग आहे. वैश्विक भावना त्यांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. प्राध्यापक विश्वास वसेकर यांच्या कवितेला सामाजिक, वैश्विक स्वरूप प्राप्त झालेले आहे. सध्या सोशल मीडियावर सिनेमांच्या ज्या कथा येत आहेत त्यामध्ये आपल्या हातात काहीच राहिलेले नाही, अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले, प्रेम भावना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी प्राध्यापक वसेकर यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. राजेंद्र माने म्हणाले, प्रतिभा संपन्न म्हणजे काय असते हे जाणायचे असेल तर वसेकरांची फक्त सूची वाचली तर ते लक्षात येते. लेखक समजून घेणे ही प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर त्या लेखकाच्या सर्व साहित्याचे वाचन केले पाहिजे. निसर्गाकडे निरपेक्षपणे ते जेवढे बघतात तेवढेच माणसाकडे ही ते बघतात.
मुकुंद फडके म्हणाले, कविवर्य विश्वास वसेकर यांच्या व्यक्तिमत्वावरच मला अत्यंत कुतूहल आहे. त्यांची भाषा मार्मिक, खोचक, विनोदी अशी आहे. अष्टपैलू साहित्यिक असे आपण त्यांना म्हणू शकतो.त्यांनी विविध प्रकारचे छंद जोपासले आहेत

Advertisement

ऍड सिमंतीनी नूलकर म्हणाल्या, कविवर्य विश्वास वसेकर यांचे अनेक प्रकारचे साहित्य आहे. श्रेष्ठ दर्जाचे साहित्य कधी लिहिले जाते याविषयी त्यांनी ऊहापोह केलेला आहे. प्रवासवर्णन म्हणजे त्या लेखकाचे व्यक्तिमत्व असते. प्रवास वर्णन करताना प्रदेशाचे उत्तम वर्णन त्यांनी केले आहे. प्रेम हा चिंतनाचा, विचाराचा विषय आहे असे ते म्हणतात. त्यांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे शब्दांचा खजिनाच असून ऋतू बरवा हे प्रेमात पडेल असे पुस्तक असून ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. जगण्याचे उत्सव करणारा हा माणूस आहे.

डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, प्राध्यापक विश्वास वसेकर यांचे वय 73 वर्ष असून त्यांनी एकूण 65 पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या बहुतेक कविता प्रेम या विषयावरील असून मनाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या त्यांच्या कविता आहेत.’ अडीच अक्षरी कविता ‘ या कविता संग्रहाला प्राध्यापक मिलिंद जोशी यांची प्रस्तावना असून ती वाचावी अशीच आहे. ‘ ऋतू बरवा ‘ हे त्यांचे पुस्तक माझ्या आवडीचे असून ते बंडखोरीचे आहे. या पुस्तकाला त्यांनी वास्तवाची बदलत्या विज्ञानाची जोड दिलेली आहे.

शिरीष चिटणीस म्हणाले, प्राध्यापक विश्वास वसेकर यांनी कथा, कादंबरी, चित्रपट, कविता अशा सगळ्या वर लेखन केलेले आहे. विश्वास वसेकर यांची दैनिक सकाळ, दैनिक प्रभात, दैनिक सामना यामध्ये विविध सदरे प्रसिद्ध होत असतात. विदर्भ, मराठवाडा व कोकणामधील विविध साहित्यिक पुण्या मध्ये येऊन राहिलेले आहेत त्याचे कारण म्हणजे लेखकाला त्याच्या ज्या कलाकृती रसिकापर्यंत पोहोचवाव्यात ही त्याची जी धारणा असते ते सर्व पुण्यात आल्यानंतर शक्य होते. दहा ते वीस वर्षानंतर साहित्य क्षेत्रासंबंधी जेव्हा विचारमंथन होईल त्यामध्ये दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहाबद्दल बोलले जाईल, असा मला विश्वास वाटतो. यापुढील काळात प्रत्येकाने प्रतिभावंताच्या सानिध्यात राहून आपली प्रतिभा मुलापर्यंत पोहोचवुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी शिल्पा चिटणीस,ममता नरहरी,संतोष वाघ,सुधीर मुळे,अश्विनी कोठावळे,गीतांजली पाटील,ज्योती नलवडे,कल्याण भोसले,खराटे सर, अनिल सुर्वे,हणमंत खुडे,सेग्या गावित,संदीप जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दत्तात्रय पाटील आणि रमेश महामुलकर यांनी वसेकर यांच्या २ कवितांचे ढोलकी आणि पेटीवर संगीतमय सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले. आभार विनायक भोसले यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!