धनगर आरक्षणाला मोठा धक्का
याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली
नवी दिल्ली
धनगर आरक्षणाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाची आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.धनगर आणि धनगड हा शब्द सारखा आहे, त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता, हा निकाल सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला आहे.
भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातींची सूची तयार करण्यात आली, यात संसदेने त्यात 1976 पर्यंत वेगवेगळ्या सुधारणा केल्या, यात धनगड जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, म्हणून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळणार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, अखेर सुप्रीम कोर्टानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला, यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे.
धनगर समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळत आहे, पण एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाने आंदोलनंही केली. दुसरीकडे धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यायला आदिवासी समाजाकडूनही विरोध झाला. अखेर ही लढाई कोर्टात गेली, मुंबई हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यायची याचिका फेटाळून लावली आहे.
