गुणांच्या टक्केवारीची पद्धत बंद


नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला क्रेडिट मिळवावे लागणार

Advertisement

नवी दिल्ली
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार असून या धोरणानुसार आता गुणांच्या टक्केवारीची पद्धत कायमची बंद होणार आहे त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला क्रेडिट मिळवावे लागणार आहेत.
नवीन धोरणात प्रात्यक्षिक ज्ञानावर सर्वाधिक भर दिल्याने विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यआधारित शिक्षण मिळणार असून, त्यामुळे बेरोजगारी कमी होईल, अशी आशा आहे. एखाद्या विद्यार्थ्याने बी.., बीकॉम. किंवा बी.एससीला प्रवेश घेतल्यास त्याला पदवी पूर्ण होईपर्यंत विषयात बदल करण्याची संधी नव्हती. पण, नवीन धोरणात विद्यार्थ्याला आवडणाऱ्या विषयातून प्रवेशित महाविद्यालय सोडून दुसऱ्या महाविद्यालयातून काही विषयाचे शिक्षण घेता येणार आहे. पदवीतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात इंटर्नशिप करता येणार आहे.
पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणावेळी विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरला संशोधन पद्धती म्हणजेच पुस्तकी धडे मिळतील, पण दुसऱ्या सेमिस्टरला विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करावे लागेल. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये संशोधन प्रकल्प आणि शेवटच्या सेमिस्टरमध्ये लघू शोधनिबंध सादर करावा लागणार आहे. दुसरीकडे त्याला त्या त्या सेमिस्टरमधील थेअरीचे पेपर देखील द्यावे लागतील. डी.एड, बी.एडसंदर्भात तूर्तास काहीच बदल नसल्याने याची प्रवेश प्रक्रिया शिक्षण पूर्वीप्रमाणेच असणार आहे. भारतीय ज्ञान पंरपरेचा एक पेपर असणार असून त्यात विविध बाबींचा समावेश असणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातून शिक्षण घेता येणार आहे. एक किंवा दोन वर्षानंतर एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण सोडल्यास त्याला त्या त्या वर्षाचे प्रमाणपत्र मिळेल. नवीन धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठासह सर्वच संलग्नित महाविद्यालयांमध्ये २०२४२५ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
प्रत्येक पेपर चार क्रेडिटचा तर प्रत्येक सेमिस्टर २२ क्रेडिटचे असणार आहे. तेवढे क्रेडिट घेतल्याशिवाय विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही.
एका क्रेडिटसाठी घड्याळी १५ तास म्हणजेच चार क्रेडिटसाठी विद्यार्थ्याला वर्गात बसून ६० तास शिकावे लागेल.वर्षाच्या एकूण क्रेडिटमध्ये काही क्रेडिट विद्यार्थ्याचे वर्तन इतर बाबींसाठी देखील असणार आहेत.विद्यापीठातील किंवा संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे संपूर्ण वर्षाचे क्रेडिट ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिटमध्ये जतन केले जाईल. त्यानुसार त्या त्या वर्षाचे निकाल प्रसिद्ध होतील. पदवीच्या पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना जनरल विषय घेता येतील, पण द्वितीय वर्षात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन करावयाचे विषय घ्यावे लागतील. त्याशिवाय दुसऱ्या आवडत्या विषयातूनही शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहील.
नवीन धोरण लागू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच राहणार आहे. पण, अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, त्याला अभ्यास मंडळाने मान्यता देखील दिली आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने एका वर्षानंतर शिक्षण अर्ध्यातून सोडल्यास त्याला त्या वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळेल आणि दुसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळेल. पदवीचे तीन वर्षे आणि आणखी एक वर्ष सलग शिक्षण घेतल्यास चार वर्षानंतर विद्यार्थ्यास रिसर्च डिग्री मिळणार आहे. त्यानंतर पुढे एक वर्ष शिकल्यास एमएची पदवी दिली जाणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!