13 वर्षांच्या मुलीला नोकरीची ऑफर
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी घेतली दखल
नवी दिल्ली
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एका 13 वर्षांच्या मुलीला नोकरीची ऑफर दिली आहे. या मुलीने ‘अलेक्सा’ची मदत घेऊन स्वतःला आणि तिच्या लहान बहिणीला माकडाच्या हल्ल्यापासून वाचवले. आनंद महिंद्रा यांनी या तरुणीला तिची निर्णय क्षमता ओळखून मायक्रो ब्लॉगिंग साइट X च्या माध्यमातून नोकरीची ऑफर दिली आहे.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील 13 वर्षीय निकिता या मुलीने अलेक्सा यंत्राच्या मदतीने माकडाला घरातून हुसकावून लावलेच पण 15 महिन्यांच्या मुलीलाही आपल्या बुद्धीने वाचवले. मुलीने अलेक्साला तिच्या बहिणीच्या खोलीत घुसलेल्या माकडाला घाबरवण्यासाठी कुत्र्यासारखे भुंकण्याची सूचना केली. रणनीती कामी आली आणि मुलीने स्वतःला आणि तिच्या बहिणीला वाचवले.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “आपल्या काळातील पहिला प्रश्न हा आहे की आपण तंत्रज्ञानाला बळी पडतो की आपण त्याचा योग्य वापर करू शकतो. या मुलीची कृती एक दिलासा देते की तंत्रज्ञान नेहमीच ह्युमन टॅलेंटला चालना देणारे राहील.मुलीची जलद विचार क्षमता विलक्षण होती.
प्रतिकूल परिस्थितीत अनपेक्षित निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आहे हे तिने दाखवून दिले. जर तिला तिचे शिक्षण पूर्ण करून कॉर्पोरेट जगतात सामील व्हायचे असेल, तर मला आशा आहे की @MahindraRise येथे आम्ही तिला आमच्यात सामील होण्यास राजी करू शकू.”
