संजय राऊत नौटंकी थांबवा:नाना पटोले
लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य न करण्याचे आवाहन
मुंबई :
शिवसेना नेते संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना तंबी दिली आहे
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू-मैं मैं पाहायला मिळत आहेत.
लोकशाही विरोधातील भाजपचं सरकार हे कशाही प्रकारे सत्तेत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, असे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, असं असतानाही लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करावं हे न पटण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, असं संजय राऊत यांनी सांगलीतील सभेत भाजप उमेदवार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
