मताधिकार वापरणे हा समृद्धीचा मार्ग:धनंजय चोपडे
कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष जनजागृती मोहीम
सातारा
“मताधिकार वापरणे हा समृद्धीचा मार्ग आहे. हाच भारतीय संस्कृती जपण्याचा मार्ग आहे आणि सर्वांगीण राष्ट्र विकासामध्ये सहभागी होण्याचा मार्ग आहे.मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे .मतदानाचा अधिकार हा आपणास राज्यघटनेने दिलेला आहे. शंभर टक्के मतदान ही आदर्श अवस्था निर्माण होणे अत्यावश्यक आहे”, असे प्रतिपादन कोरेगावचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केले .
५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष मोहीम जनजागृतीसाठी राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असणाऱ्या “कोडोली ९४” या केंद्र अंतर्गत कोडोली मधील अंगणवाडीमध्ये आयोजित जनजागृती मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जनजागृती समन्वय अधिकारी सुजितकुमार इंगवले, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर ,मंडल अधिकारी श्रीमती अबिदा सय्यद तसेच अंगणवाडी सेविका, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मतदान जनजागृती पूर्ण क्षमतेने प्रशासन करीत आहे. ५० टक्के पेक्षा कमी मतदान असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यावेळी श्री. चोपडे म्हणाले,” जास्तीत जास्त मतदान हा प्रगल्भ लोकशाहीचा आत्मा आहे .राष्ट्राची समृद्धी, विकास आणि भावी भावी पिढीचे उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात मनापासून सहभागी व्हायला हवे. स्वतः मतदान कराच आणि इतरांना मतदानाची आठवण करून द्या. त्यांना उद्युक्त करा.मतदानाचे महत्त्व समजावून द्या. मतदान हा केवळ अधिकार नसून ती एक जबाबदारी आहे.
“पथकप्रमुख श्री. यशेंद्र क्षीरसागर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
