मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना वॉर्निंग
लोकसभा ही विधानसभेची नांदी, त्यावरच अस्तित्व अवलंबून
मुंबई
लोकांना केवळ राजकीय मुद्दे सांगू नका तर आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी लोकांपुढे ठेवा. विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडा कारण आपल्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. सकारात्मक आणि विकासात्मक बोला, असा कानमंत्र पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.लोकसभा ही विधानसभेची नांदी, त्यावरच अस्तित्व अवलंबून आहे अशी वॉर्निंगही मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना दिली
शिवसेना पक्षाची लोकसभा निवडणूक आढावा बैठक मुंबईमधील वरळीच्या सरदार वल्लभभाई पाटील डोममध्ये संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी विविध मतदारसंघाचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, प्रवक्ते, मंत्री तसेच आमदार खासदारांची बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी ताकीद देत त्यादृष्टीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांना दिल्या. महायुतीत लढत असताना मित्रपक्षांना सगळ्यांनी मदत करा, आडमूठी भूमिका घेऊ नका, कारण आपल्या उमेदवारांना देखील मित्रपक्ष मदत करणार आहेत. लोकसभेत पक्षाची सर्वोत्तम कामगिरी कशी होईल याकडे लक्ष द्या, पुढील दोन महिने डोळ्यात जातीने लक्ष देऊन काम करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना एक्सपोज करा, अशा सूचना करतानाच आपण महायुती म्हणून लोकसभा निवडणुकांना सामोरे जातोय, त्यामुळे पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही, महायुतीतील घटकपक्षांना सहकार्याची भूमिका ठेलवा. शेवटी लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी सक्त ताकीदच मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या शिवाजी पार्कमधील समारोपीय भाषणात ठाकरेंना हिंदू बांधव भगिनी म्हणायची लाज वाटली. २०१९ साली ठाकरेंनी जनमताचा आदर करून महाविकास आघाडीची स्थापना केली. बाळासाहेबांच्या इच्छेविरूद्ध ते वागत आहेत, हे मुद्दे लोकांसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
लोकांसमोर जात असताना केवळ राजकारण घेऊन जाऊ नका. आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी त्यांच्यासमोर ठेवून लोकांची मने वळवा. ५०/६० वर्षात कॉंग्रेसने काय केलं आणि गेल्या १० वर्षात काय झालं हे लोकांसमोर मांडा. अडीच वर्ष सरकार घरी बसलं होतं. गेल्या दोन वर्षात आपलं शासन लोकांच्या दारी गेलंय हे आवर्जून सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपण मराठा आरक्षण दिले. न्यायालयीन पातळीवर टिकणारे आरक्षण दिले आहे.पोलिस भरती या आरक्षणानुसार होत आहेत. मराठा समाजाला न्याय दिला पण तो देत असताना ओबीसींवर कोणताही अन्याय केला नाही हे लोकांच्या मनावर ठसवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना केल्या
