पाचव्या कसोटीत भारताचा मोठा विजय


इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत मालिका ४-१ ने घातली खिशात

धरमशाला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचव्या आणि आणि शेवटच्या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन करताना इंग्लंडचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्याची मालिका ४-१ ने खिशात घातली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करत २५९ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १९५ धावांवर गारद झाला. १००वी कसोटी खेळणाऱ्या अश्विने सर्वाधिक ९ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

आज दुसऱ्या सत्रात संपूर्ण इंग्लंड संघ गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.

Advertisement

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८४ धावांची चांगली खेळी केली. पण इंग्लंडची टॉप ऑर्डर पुन्हा सपशेल अपयशी ठरली. सलामीवीर झॅक क्रॉऊली एकही धाव न काढता अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. बेन डकेट २ धावा करून बाहेर पतला. ऑली पोप १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, जॉनी बेअरस्टोने ३९ धावांची छोटी पण चांगली खेळी खेळली. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स २ धावा करून बाद झाला. त्यानंतर बेन फॉक्सला अश्विनने क्लीन बोल्ड केले. दुसऱ्या डावात भारतासाठी अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने ५ फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!