उत्कर्ष दिवाळी अंकाचे प्रकाशन


पुणे
उत्कर्ष दिवाळी विशेषांक २०२६ चे प्रकाशन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि निवेदनकार सुधिर गाडगीळ यांचे हस्ते झाले.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले – देशात पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि पहिला दिवाळी अंक मराठीत निघाला. मराठी भाषेची गोडी युवकामध्ये निर्माण व्हावी यासाठी वासुकाका जोशी यानी चित्रशाळेतून चित्रमय जगत प्रकाशन सुरू केले. ही मराठी संवर्धनाची परंपरा उत्कर्ष प्रकाशन प्रकाशनच्या सुधाकर जोशी यानी सातत्याने जपली आहे. उत्कर्ष दिवाळी अंक हा मराठी साहित्याने समृद्ध झाला आहे.
मराठी माणसाची साहित्याशी असलेली विशेष बांधिलकी अधोरेखित करताना डॉ. मोरे म्हणाले दिवाळी अंकाच्या परंपरेला १०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. वासुकाका जोशी यांनी स्थापन केलेल्या ‘चित्रशाळा’ प्रकाशनाची आणि त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध या अंकाची परंपरा सुधाकर जोशी पुढे चालवत आहेत. इंटरनेट किंवा सोयी नसतानाच्या काळात जगभरातील घडामोडी चित्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड कार्य ‘चित्रमय जगत्’ने केले होते. तसेच वासुकाका जोशी हे लोकमान्य टिळकांसोबत इंग्लंडला व नेपाळलाही गेले होते, असा ऐतिहासिक संदर्भ त्यांनी दिला. दिवाळी अंकांमध्ये तरुण पिढीला जोडण्यासाठी इंग्रजीतील साहित्याचा समावेश करण्यासारखे चौरंगी व नावीन्यपूर्ण प्रयोग केले जात आहेत. सुधाकर जोशी यांनी आळंदी देवस्थानचा कारभार सांभाळताना ज्ञानेश्वर महाराज, आळंदी व वारकरी संप्रदायाशी संबंधित ग्रंथ अत्यंत कमीत कमी माफक दरात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याची सेवाभावी भूमिका घेतली. ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘अमृतानुभव’ ग्रंथावर समर्थ संप्रदायातील वासुदेव नावाच्या सद्गृहस्थांनी १००-१५० वर्षांपूर्वी लिहिलेली दुर्मिळ अभंगात्मक ‘वासुदेवी टीका’ शोधून तिचे संपादन व प्रकाशन करण्यात आले.पुस्तक विक्री, ग्रंथालय चालवणे आणि प्रकाशन अशा साहित्य व्यवहारातील सर्वच आघाड्यांवर जोशी कुटुंब सक्रिय आहे. आता त्यांच्या नीलिमा वाडेकर-जोशी या कन्येनेही या कार्यात मदत सुरू केली असून, त्यांच्या सतत कार्यरत राहण्याच्या वृत्तीचा डॉ. मोरे यांनी गौरव केला.यंदाच्या दिवाळी अंकाचे स्वागत करत डॉ. मोरे यांनी केले.

यावेळी प्राचार्य श्याम भुर्के प्रास्ताविकात म्हणाले, उत्कर्ष प्रकाशनाच्या जागेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक नवीन प्रेरणा मिळते. येथे उपलब्ध असलेल्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांमधून हजारो वर्षांच्या अनुभवांचा व कर्तृत्वाचा ठेवा वाचकांना मिळतो. सुधाकर जोशी यांनी सुरुवातीच्या काळात फूटपाथवर पुस्तक विक्रीपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. पानशेतच्या महापुरात त्यांची टपरी वाहून गेल्यानंतरही न खचता त्यांनी या संकटाचे रूपांतर संधीत केले आणि उत्तम जागेत दुकानासह प्रकाशनाचा मोठा विस्तार केला.डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट किंवा इतर क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना आपले पुस्तक प्रकाशित करायचे असल्यास उत्कर्ष प्रकाशन त्यांना पूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन देते.नवोदित कवींना किंवा लेखकांना थेट परत न पाठवता, त्यांच्या साहित्याची स्वतःकडूनच पुन्हा सुधारित मांडणी करून घेऊन संपादकीय मार्गदर्शन देऊन त्यांच्यातील लेखनगुणांना पैलू पाडण्याचे काम उत्कर्ष करते.दरवर्षी होणारा उत्कर्षचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा हा साहित्याचा आनंदोत्सव असतो. याव्यतिरिक्त, दर रविवारी सकाळी ११ वाजता येथे भरणारे ‘साहित्य मंडळ’ हे चांगल्या विचारांच्या माणसांचे भेटण्याचे व विचारांची देवाणघेवाण करण्याचे केंद्र बनले आहे.

Advertisement

यावेळी उत्कर्ष प्रकाशन चे संस्थापक सु. वा. जोशी म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून दिवाळी अंक विकण्याचा अनुभव आम्हाला असून लक्ष्मी रोडवर ‘पूनम एजन्सी’च्या माध्यमातून पिशवीत अंक भरून घरोघरी, जिमखान्यावरील बंगल्यांवर आणि ना. सी. फडके यांच्यासारख्या साहित्यिकांकडे जाऊन विक्री करण्यापासून या प्रवासाची सुरुवात झाली.पानशेतच्या महापुरात टपरी वाहून गेल्यानंतर जिमखान्यावर टपरी उभारली; ती रस्ता रुंदीकरणात गेल्यावर दुकान घेतले. अलीकडेच कोर्टाच्या निकालामुळे ग्रंथालयाची जागा गमवावी लागली, तरीही खचून न जाता प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने तोंड देत व्यवसाय सुरू ठेवला आहे.डॉ. सदानंद मोरे, शिरीष चिटणीस आणि डॉक्टर सुधीर राशीनकर अशा मित्रांचे नेहमी सहकार्य लाभते. तसेच दिवाळी अंकाचे कव्हर मुखपृष्ठ करण्याचे काम कायम रवी मुकुल यांच्याकडेच सोपवले जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी नीलिमा जोशी – वाडेकर म्हणाल्या,उत्कर्षाचा स्वतःचा दिवाळी अंक असावा हे बाबांचे (सुधाकर जोशी) कित्येक वर्षांचे स्वप्न होते. त्यांच्या अथांग कष्टांतून आणि प्रेरणेतूनच हा अंक साकार होऊ शकला.सिंगापूरमध्ये असताना ‘बहर’ हा दिवाळी अंक काढल्याचा अनुभव मला होता; मात्र भारतात अंक करताना दैनंदिन कामाचा व लेखकांचा सातत्याने पाठपुरावा फॉलो-अप करावा लागतो, हा वेगळा अनुभव मिळाला. पुस्तक आणि अंक प्रकाशन अविरत चालू ठेवतानाच, तरुण वाचकांना जोडण्यासाठी इंग्रजी साहित्याचा थोडा समावेश आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची योजना आहे.अंकासाठी घेतलेल्या कथा स्पर्धेला भारत, अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, इंग्लंड आणि झांबिया येथून जवळजवळ २०० कथा आल्या . यातून अहिल्यानगर, सांगली आणि पुणे येथील लेखकांच्या कथांची विजेते म्हणून निवड करण्यात आली.स्पर्धेत निवड न झालेल्या परंतु उत्कृष्ट असलेल्या कथा वाया जाऊ नयेत म्हणून लेखकांच्या परवानगीने स्वतंत्र कथासंग्रह प्रकाशित करण्याचे नियोजन आहे.यंदा झालेला उशीर टाळण्यासाठी पुढील वर्षाच्या कथा स्पर्धेची ३० मार्च ही अंतिम मुदत ठेवून घोषणा करण्यात आली आहे.एकाच विषयाऐवजी वाचकांना विविध साहित्याचा आस्वाद घेता यावा म्हणून ‘प्लॅटर’ संकल्पनेवर आधारित अंकात विविध विषयांचा समावेश केला आहे. यात दीपक ठाकूर जिंजीचा लेख , कविता कृष्णमूर्ती यांची मुलाखत, शरण पाटील, श्याम भुर्के, डॉक्टर सुधीर राशीनकर आणि रवी मुकुल यांच्या लेखांचा समावेश आहे.या अंकासाठी चार पिढ्यांचा सहभाग लाभला असून, कुटुंबातील ९६ वर्षांच्या ज्येष्ठ नातेवाईकांनी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटले आहे; तसेच पती गौरव यांचे तांत्रिक सहकार्य व आईचे वाचन-मार्गदर्शन लाभले.

दरम्यान उत्कर्ष दिवाळी अंकातील लेखक, स्वप्निल पोरे, रवि मुकुल, प्राचार्य श्याम भुर्के , डॉ. सुधीर राशिंगकर, डॉ. दिपक शिकारपूर यांचा डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.संपादक स‌ल्लागार डाॅ.सविता जोशी,शिरीष चिटणीस यांचाही सत्कार, सुधीर गाडगीळ यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी साहित्यिका सुलभा कुलकर्णी, अभिनेत्री गीता भुर्के, जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के यांनी आभार प्रदर्शन केले. दिवाळी फराळाने साहित्यिक मेळाव्याची सांगता झाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!