लॉकरमधून 5 कोटींचं सोनं लंपास
नाशिकमधील घटनेने खळबळ
नाशिक :
बँकेच्या सेफ्टी लॉकरमधून पाच कोटी रुपयांचे दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून ४ कोटी ९२ लाखांचे दागिने लंपास करण्यात आलेत. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जुना गंगापूर नाका परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. इथं सेफ्टी लॉकरमध्ये २२२ ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते. शनिवारी एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेले असताना लॉकर उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. लॉकरमध्ये सोने नसल्याने सर्वजण हादरले.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक रणजित देशमुख यांना लॉकरमध्ये सोने नसल्याबाबत कळवण्यात आलं. बँकेचे व्यव्यवस्थापक रणजित देशमुख यांनी जयेश कृष्णदास गुजराथी याना माहिती दिली. त्यांनीही लॉकरची पाहणी केली असता ते रिकामं असल्याचं आढळून आलं. जयेश यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अज्ञातांनी इमारतीत असणाऱ्या फायनान्स शाखेच्या बिझनेस व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेऊन ते उघडले. चोरांनी ओळख लपवण्यासाठी कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या पीपीई किटचा वापर केला होता. तसंच चेहऱ्याला मास्क आणि डोक्यावर टोपी घातली होती. दरम्यान, पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात आजी-माजी कर्मचाऱ्यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं म्हटलंय. लॉकरच्या किल्ल्या चोरांना कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
