‘कोऱ्या कागदापल्याड’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘पुणे पुस्तक जत्रे’ मध्ये आयोजन
पुणे
आकाश निरभ्र असो किंवा ढगांनी दाटलेले, मनाच्या आकाशात भावनांचे रंग सतत उमटत असतात. याच भावविश्वाला शब्दरूप देणाऱ्या ‘कोऱ्या कागदापल्याड’ या काव्य कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे भरलेल्या ‘पुणे पुस्तक जत्रे’ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड येथे करण्यात आले होते.
वाई येथील तनुजा इनामदार,पूजा चौंडे,आदित्य चौंडे,अजित क्षीरसागर या चार कवी, कवयत्रींच्या कलाविष्कारातून ‘कोऱ्या कागदापल्याडचा’ भावविश्वाचा प्रवास अलवार उलगडला.या कार्यक्रमात विविध विषयांवरील स्वलिखित कवितांचे सादरीकरण करण्यात आले.त्यातून जीवनातील विविध पैलू, अगदी बालपण ते लग्न हा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने कवितांच्या माध्यमातून रसिकांच्या समीर उलगडला गेला.
कार्यक्रमात कवींच्या स्वलिखित कवितांचे बहारदार सादरीकरण झाले. कवितांना संगीताची साथ लाभल्याने त्या अजूनच श्रवणीय झाल्या. या कार्यक्रमात
तनुजा इनामदार, पूजा चौंडे आदित्य चौंडे आणि अजित क्षीरसागर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.तसेच मुंबई व पंजाब येथील ‘अल्फा म्युझिक बँडच्या’ संगीत संयोजनामुळे कवितांना सुरेल स्पर्श लाभला. कविता कशी सुचते हे कोणताच कवी सांगू शकत नाही,पण ती सुचल्यावर मात्र किती आनंदी होतं मन हे सांगणारी तनुजा इनामदार यांची ‘ती अवचित येऊन उभी ठाकते दारी,तर कधी करावी लागते तिची मनधरणी’ या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर आपल्या बालपणात बोट धरून घेऊन जाणाऱ्या ओव्या पूजा चौंडे यांनी सादर केल्या.अगदी आजीच्या पदराचा गंध अनुभवता यावा एवढ्या त्या ओव्यांत रसिक मंत्रमुग्ध झाले. आदित्य चौंडे यांच्या ‘बे एके बे’ या कवितेने तर सर्वांनाच ताल धरायला लावला आणि सगळे उपस्थित श्रोते त्याला साथ देऊ लागले.
शाळेत ‘आपला प्रिय असणारा बेंच’ आणि त्यावर ‘आपल्याला नेऊन बसवणारी श्री’ ही अजित क्षीरसागर यांची कविता याचा सुरू झालेला प्रवास त्यांनी अगदी स्वयंपाक घरातील लुटीपुटूच्या भांड्यांच्या आवाजाने सुरू होणाऱ्या शीतयुद्ध पर्यंत आपल्याला घेऊन गेला.
बेंच तिथेच राहतो मित्रा आपण वर्ग सोडुनी जातो असं म्हणत असतानाच
शाळेतल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारी कविता पूजा चौंडे यांनी सादर केली.
‘मी रानफुल व्हावे,वाऱ्यासंगे झुलावे !मैफिलीत रानाच्या मी एक तान व्हावे. ‘फुलपाखरू मनाचे उडते इथून तेथे एक चित्त राहणे त्याला कधी न ठावे’ अस म्हणत सोळाव्या वर्षाच्या वयातल्या असच एक कुर्ता होता म्हणत आदित्य चौंडे आपल्याला त्या कॉलेजच्या रंगू बेरंगी दुनियेत घेऊन गेले. मुलांच्या मनातील उत्सुकता की ती आपल्या बद्दल काय विचार करते हे सांगणारी ‘तुला पाहताना किती मी रमावे,तुझ्या नजरेला किती मी भुलावे, तुझी मूक भाषा तुझे छंद सारे तुझे हास्य आणि तुझे रूप न्यारे,
ही कविता मुलांच्या मनातील उत्सुकता जाणून तनुजा इनामदार यांनी सादर केली. अजित क्षीरसागर यांची ‘झुमका’,आदित्य चौंडे यांची ‘मागणी’ आणि पूजा चौंडे यांची ‘गोष्ट मात्र छानच हवी’ या कवितांची मैफल जमत असतानाच तनुजा इनामदार यांची ‘चांदण झुला रसिकाना’ अगदी चांदण झुल्यात नेऊन बसवणारी ठरली.
अशा अनेक उत्तमोत्तम कविता आणि ‘हा मोरया कागदा पल्याडचा’ कार्यक्रम रंगतदार पार पडला. या कार्यक्रमासाठी संयोजक पी. एन. आर. राजन, शिरीष चिटणीस प्रमुख पाहुणे डॉ संदीप श्रोत्री,विजया जोशी,सुनिता राव आणि इतर मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

