बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
पंढरपूर,
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सूचनांची तत्परतेने अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या कामाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी तत्परतेने आणि धडाडीने निर्णय घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

