तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडण्यासाठी संगीताची साथ आवश्यक : अनिल काटदरे


 

‘स्वर–रफी’ कार्यक्रमात सदाबहार गीतांची सुरेल मैफल

सातारा
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत प्रत्येकाने स्वतःसाठी एखादा छंद जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. आपला मसाले व विविध उत्पादनांचा व्यवसाय गणिती आणि काहीसा रुक्ष स्वरूपाचा असला, तरी या रुक्षतेतून बाहेर पडून मनःशांती आणि आनंद मिळविण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन उद्योजक अनिल काटदरे यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि संगीतप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वर–रफी’ या संगीत कार्यक्रमात ते बोलत होते. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. रफी यांच्या अजरामर गीतांनी रंगलेल्या या सुरेल मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनिल काटदरे यांनी आपण संगीताचे रसिक असल्याचे नमूद केले. व्यवसायाच्या धावपळीतून काही क्षण स्वतःसाठी काढणे आणि कलेच्या माध्यमातून मनाला आनंद देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी संगीतप्रेमी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी किशोर देशपांडे यांनी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी समूहगान स्पर्धा, प्रश्नमंजूषा तसेच दिव्यांग बांधवांसाठी विविध सेवाकार्य उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांतून तरुण पिढीवर संस्कार घडतात. जुन्या गाण्यांमधील आशयपूर्ण शब्द आणि संगीतामधून कौटुंबिक मूल्ये व संस्कार जपले जातात. संगीताच्या कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. संगीतप्रेमी ग्रुपच्या कार्याला शुभेच्छा देताना भारत विकास परिषदेतर्फेही अशाच प्रकारचा संगीतमय उपक्रम आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

शिरीष चिटणीस म्हणाले, कराओके हे समाजातील सर्व स्तरांतील आणि विविध वर्गांतील नागरिकांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. दैनंदिन जीवनातील मतभेद, वेगवेगळे विचार आणि संस्कार बाजूला ठेवून केवळ निखळ संगीताचा आनंद घेण्यासाठी हे व्यासपीठ काम करते. दीपलक्ष्मी पतसंस्था आणि साताऱ्यातील सांस्कृतिक चळवळीचे गेल्या २९ वर्षांपासून अतूट नाते आहे. संगीतप्रेमी ग्रुपचा हा २४ वा कार्यक्रम असून नवोदित कलाकारांना नेहमीच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात अपर्णा गायकवाड, स्नेहल चिंचणे, विनयकुमार, प्रमोद लोंढे आणि राजेंद्र पाटील यांनी रफी यांच्या सदाबहार गीतांचे सादरीकरण केले. एकापाठोपाठ एक लोकप्रिय गीते सादर होत असताना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.

कार्यक्रमास अनिल काटदरे, हेमंत कासार, गिरीश दोशी, किशोर देशपांडे, गोपाळ काळे, प्रकाश बडदरे, शिरीष चिटणीस (संस्थापक-अध्यक्ष, दीपलक्ष्मी पतसंस्था), विनय कुलकर्णी, प्रमोद लोंढे व राजेंद्र पाटील यांच्यासह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील आणि विनयकुमार (संस्थापक, संगीतप्रेमी) यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!