युवा पिढीने अहिल्यादेवींच्या गुणांचा अवलंब करावा
वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ.गो.बं देगलूरकर यांचे आवाहन
पुणे
१७ व्या शतकामध्ये एक स्त्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सक्षम राज्यकारभार केला, आपली संस्कृती जोपासली, परंपरेचे रक्षण केले युवा पिढीने त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या गुणांचा अवलंब आपल्या जीवनात करावा असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तीतज्ञ मा.डॉ.गो.बं देगलूरकर यांनी केले.
संस्कार भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सिनियर कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रांत स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ म ए सो, सिनियर कॉलेज, पुणे येथील सभागृहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मूर्तीतज्ञ मा.डॉ.गो.बं देगलूरकर, संस्कार भारतीचे प्रांत अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, सह महामंत्री व या वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख अमित मराठे, केंद्रीय पदाधिकारी सतीश कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र वैद्य, उपप्राचार्या सौ.पूनम राऊत यांची विशेष उपस्थिती होती.
संस्कार भारतीच्या जिल्हा समिती स्तरावर घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीमधून विजयी झालेल्या स्पर्धकांनी सकाळी पहिल्या सत्रात अंतिम फेरीमध्ये आपली विषय मांडणी केली. सर्व स्पर्धकांनी प्राथमिक व अंतिम फेरीत वेगळे विषय घेवून चरित्र मांडणी केली होती, हे या स्पर्धेचे विशेष होय. यानुसार त्यांचे गुणांकन स्पर्धेचे परीक्षक प्रणवकुमार पाटील व सौ.स्वाती वैद्य यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. पूर्वा काणे, द्वितीय क्रमांक मेघना कुलकर्णी, तृतीय क्रमांक रिया कच्छवा यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक जान्हवी हिरवे व अनुजा वाघमारे यांनी पटकावले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम प्रदान करण्यात आली. याच बरोबर परीक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.
देगलूरकर सरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, १७ व्या शतकामध्ये एक स्त्री म्हणून अहिल्यादेवींनी कसा सक्षम राज्यकारभार केला, आपली संस्कृती जोपासली, परंपरेचे रक्षण केले हे विषद केले. युवा पिढीने त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या गुणांचा अवलंब आपल्या जीवनात करावा असे प्रतिपादन केले.
संस्कार भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी मध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात अग्रेसर आहे याबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारतीचे प्रांत प्रचार प्रमुख रुपेश कुंभार यांनी केले, तर आभार प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांनी मानले.
अंतिम फेरीचे सूत्र संचालन कु.मधुरा हुबळीकर यांनी तर पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माधुरी जोशी यांनी केले.
सुहास दिवेकर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाची मएसो सिनियर कॉलेजचे प्राध्यापक तसेच कर्मचारी वर्गाने सर्व व्यवस्था अत्यंत आपुलकीने उत्तम अशी केली होती.

