संगीत, नृत्य, नाट्यातून वारीचा अनुभव


‘ध्यास पंढरी’च्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

Advertisement

साताराः संतांची अमृतवाणी, स्वर्गीय गायन, सुरेख वाद्यमेळ, शास्त्रीय नृत्याचा साज आणि अभिनयाची जोड अशा पंचतत्त्वांच्या मिलनातून पंढरीची वारी रंगमंचित करताना सातारकर कलावंतांनी कौशल्याचा अक्षरशः पाऊस पाडला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रेक्षागृहात रंगलेला ‘ध्यास पंढरी’ हा अपूर्व सोहळा रसिकांची वाहवा मिळवणारा ठरला.
शास्त्रीय संगीताच्या रियाजाने कमावलेल्या जादुई आवाजात गायक वैभव फडतरे यांनी संतांची अभंगवाणी मंचावर जिवंत केली. विशेष म्हणजे, त्यांचे गुरू संजय दीक्षित यांच्यासमोर संगीतसेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले. मानसी सदामते-डाकवे यांनी कथ्थक शैलीत तर मंदार ढवळे यांनी भरतनाट्यम शैलीत या संतरचनांवर आधारित नृत्याविष्कार सादर केला. सौरभ भिसे, निरंजन जोशी आणि कल्याण कुलकर्णी यांनी अभिनयाच्या माध्यमातून वारीवर आधारित कथानकाचे उत्कृष्ट सादरीकरण करून या रचनांना नाट्याची सुरेख जोड दिली. या अभूतपूर्व कला-मिलाफामुळे ‘ध्यास पंढरी’ हा रंगमंचीय आविष्कार अविस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया सातारकर रसिकांनी दिली.
वैभव फडतरे यांनी अभंगवाणी सादर करताना जागोजागी घेतलेल्या सुरेख हरकती आणि आलाप-ताना प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. सशक्त वाद्यवृंद हे कार्यक्रमाचे प्रमुख बलस्थान होते. तबलावादक मिलिंद देवरे आणि पखवाजवादक किरण माने यांनी प्रेक्षकांना तालात बांधून ठेवले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद परीक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या स्वरा किरपेकर यांनी संवादिनीची उत्कृष्ट साथसंगत केली. अभंगांबरोबरच नाट्यप्रसंगांना पार्श्वभूमी देणारे केदार गुळवणी यांचे व्हायोलिन रसिकांच्या काळजाला भिडले. किरण सावंत यांनी अभंगांचा अविभाज्य घटक असलेल्या टाळांनी कार्यक्रमाची लय राखली.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा या सादरीकरणासाठी राजीव मुळ्ये यांनी संवादलेखन केले. दरवर्षी न चुकता वारी करणाऱ्या वयोवृद्ध वारकऱ्याला (सौरभ भिसे) प्रश्न विचारणारा जेन-अल्फाचा प्रतिनिधी अर्थात त्याचा नातू (कल्याण कुलकर्णी) आणि वारीत भेटलेला जेन-झीचा प्रतिनिधी (निरंजन जोशी) अशी कथानकाची गुंफण होती. रील, व्लॉग करण्यासाठी वारीला आलेला तरुण आणि वयोवृद्ध वारकरी यांच्यात सहवासातून निर्माण होणारे ऋणानुबंध आणि त्यायोगे संतांच्या शिकवणीची होणारी उजळणी हा कथानकाचा पाया होता.
रंगमंचावर प्रत्यक्ष वारी साकारताना ऐश्वर्या पलंगे, मुलुक पत्की, निनाद जगदाळे, ऐश्वर्या सरनाईक आणि नमिता भिडे या नृत्य कलावंतांनी सुरेख आकृतिबंध सादर केले. चैतन्य पाटेकर यांची उत्कृष्ट प्रकाशयोजना प्रयोगाचे बलस्थान ठरली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज, विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्मार्ट अस अबॅकसचे नरेंद्र शेलार हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. ‘ध्यास पंढरी’चा हा पहिलाच प्रयोग वारीला गेल्याचा अनुभव देणारा होता आणि त्याचे असंख्य प्रयोग व्हावेत, अशी अपेक्षा सातारकर रसिकांनी व्यक्त केली.
…………………
फोटो ओळीः
‘ध्यास पंढरी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीचे दर्शन घडविणारे सातारकर कलावंत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!