‘यशोदा’च्या एमबीए विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड


सातारा :
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस (स्वायत्त), सातारा येथील व्यवस्थापन विद्याशाखेच्या (एमबीए) विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बळावर ही यशस्वी कामगिरी साध्य झाली असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणखी एक उज्ज्वल नोंद झाली आहे.
यावर्षी महाविद्यालयात आयोजित विविध कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मेग्सिस डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड, एनजे इंडिया इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स, याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, मॅप्रो, नाकोडा मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड, शेठ ब्रदर्स फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट्स तसेच इन्व्हेंटिव्ह इन्फोटेक यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांची निवड केली. विविध क्षेत्रांतील या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली संधी ही त्यांच्या ज्ञान, कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योगाभिमुख तयारीची साक्ष देणारी आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पदवीपर्यंत मर्यादित न ठेवता उद्योगांच्या अपेक्षांनुसार तयार करण्यासाठी नियमित कॉर्पोरेट ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट ओरिएंटेशन यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते राष्ट्रीय स्तरावरील निवड प्रक्रियेत यशस्वी ठरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे, डॉ. गणेश सुरवसे, सहसंचालक डॉ. रणधीसिंह मोहिते व्यवस्थापन विद्याशाखेचे प्राध्यापक, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग तसेच सर्व शिक्षकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, उत्कृष्ट प्लेसमेंट संधी आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेले सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांची प्रतिक्रिया:
“यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर उद्योगांसाठी सक्षम, जबाबदार आणि भविष्योन्मुख व्यावसायिक म्हणून घडविण्यावर भर देतो. आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये, नेतृत्वगुण, नवोपक्रमाची दृष्टी आणि व्यावसायिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली निवड ही त्यांच्या मेहनतीसोबतच संस्थेच्या उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीची पावती आहे. आगामी काळातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!