हिंदी भाषेमुळे रोजगाराच्या नव्या संधी– डॉ. प्रेरणा उबाळे
लोकमंगल हायस्कूल येथे उपशिक्षक शशिकांत जाधव यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ सत्कार
सातारा
‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था, सातारा संचलित लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी (ता. जि. सातारा) येथील ज्येष्ठ उपशिक्षक शशिकांत साहेबराव जाधव यांनी तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि विद्यार्थीकेंद्री सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. या वेळी “हिंदी भाषेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून संस्कारक्षम शिक्षणातूनच सक्षम नागरिक घडतात,” असे प्रतिपादन सहाय्यक प्राध्यापक, अध्यक्ष हिंदी विभाग मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे डॉ. प्रेरणा उबाळे यांनी केले. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव (नाना) सावंत, माजी सैनिक व निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव, कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. प्रेरणा उबाळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणातील संस्कार, शिक्षकांचे योगदान आणि हिंदी भाषेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांच्या दूरदृष्टी, जिद्द आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मजबूत परंपरा निर्माण झाली आहे. शशिकांत जाधव यांनी तीन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे समर्पण किती महत्त्वाचे असते, याचे ते उत्तम उदाहरण आहेत.”
हिंदी भाषेच्या महत्त्वावर भाष्य करताना डॉ. उबाळे म्हणाल्या, “आज जागतिक स्तरावर हिंदी भाषेला महत्त्व प्राप्त होत आहे. चीनसारखा देशही हिंदी भाषा शिकवत आहे. देशातील उद्योग, सेवा, पर्यटन, माध्यमे आणि शासकीय क्षेत्रात हिंदी जाणणाऱ्या युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीबरोबरच हिंदी भाषेचेही ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे.”
अध्यक्षीय समारोपात शिरीष चिटणीस यांनी जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “निवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून नव्या सामाजिक जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. जाधव सरांनी पुढील काळातही विद्यार्थ्यांना क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करावे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खोसह विविध क्रीडा प्रकारांत तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले.”
संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस म्हणाल्या, “निवृत्ती म्हणजे आयुष्याची सांगता नसून अनुभव समाजाला परत देण्याची सुवर्णसंधी आहे. जाधव सरांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि निस्वार्थ सेवा या मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.”
मुख्याध्यापक विजय यादव यांनी जाधव सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात पेरलेले संस्कारच पुढे समाजात फुलत असतात. जाधव सरांचे विचार आणि कार्यपद्धती प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी या शाळेशी असलेले नाते भविष्यातही कायम ठेवावे.”
कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत जाधव यांनी जाधव यांच्या यशस्वी सेवाकाळाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
माजी विद्यार्थिनी व शिक्षिका दुर्गा खंडजोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आज मी स्वतः शिक्षिका म्हणून कार्यरत असताना जाधव सरांचा आदर्श माझ्यासमोर असतो. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडेची आवड निर्माण केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस दिले. त्यांनी आम्हाला केवळ खेळ शिकवला नाही, तर शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासही दिला.”
यावेळी आदित्य जाधव, सुनिता निकम, महेश टिळेकर, मिताली अमित जाधव आणि आशा चंद्रकांत जाधव यांनीही मनोगते व्यक्त करून जाधव सरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना शशिकांत जाधव म्हणाले, “लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेने मला सतत नवनवीन शिकण्याची प्रेरणा दिली. संस्थेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि व्यक्त केलेल्या भावना सार्थ ठरविण्याचा मी प्रयत्न करेन. निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहण्याची माझी तयारी आहे. हिंदी विषयाची उणीव विद्यार्थ्यांना भासू देणार नाही. या संस्थेचे, सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे ऋण मी आयुष्यभर मानत राहीन.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी रमेश महामुलकर व श्रीनाथ सावंत यांनी तबला-पेटीच्या साथीवर स्वागतगीत सादर केले. या वेळी डॉ. प्रेरणा उबाळे यांनी ‘हिंदी व्याकरण रचना’ हा ग्रंथ लोकमंगल विद्यालयाला सप्रेम भेट देण्यात आला.
समारंभात शशिकांत जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली शशिकांत जाधव यांचा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था तसेच नेले ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
समारंभास मुख्याध्यापक विजय यादव, कल्याण भोसले, काकासो निकम, भास्कर जाधव, यू. जी. जाधव, बाळकृष्ण इंगळे, सतीश पवार, विपुल लोहार, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, हणमंत खुडे, चंद्रकांत देवगड, जगदीश खंडागळे, दत्तात्रय शिर्के, महेश टिळेकर, सयाजी पाटील, मंगेश पाटील, आयुब मोकाशी, महादेव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे यांनी केले. सूत्रसंचालन गुलाब पठाण यांनी, तर आभार नितीनकुमार कसबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शशिकांत जमदाडे, नितीनकुमार कसबे, राहुल घोडके आणि रमेश महामुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले

