श्री अंबाबाई मंदिर परिसर व कॉरिडॉर’ विकासासाठी १५०० कोटी


केंद्रीय मंत्री अमित शाह यांची घोषणा
कोल्हापूर
दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे, ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री डॉ. विनय कोरे, डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ.अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत,महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. शाह म्हणाले, ७ व्या शतकातील असलेल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ छोट्या-मोठ्या मंदिराचे संरक्षण करून येथील परिसर पुढील ६ महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. आपल्या वारशाचे, संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्याला चालना देणारे हे शासन असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारर्कीदीत आर्थिक, संरक्षण, सुरक्षा या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील विकास गतीने सुरू असल्याचेही श्री शाह म्हणाले.

Advertisement

कोल्हापूर सहकाराची पंढरी – मुख्यमंत्री श्री. फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी आग्रह धरला होता. राज्यातील ५ जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा तीर्थक्षेत्राचाही विकास सुरु आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल, असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. कोल्हापूर शहर हे केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगितले.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर जाईल. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे.अमित शाह हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल श्री. शाह यांनी घडविले आहेत.
पालकमंत्री श्री. अबिटकर म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गंत या ठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण होतील. राज्यातील इतर सुविधांना ही केंद्र शासनाने गती देवून महाराष्ट्राचा विकास करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संयोजकाच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती व तलवार देऊन सन्मान करण्यात आला. श्री. शाह यांच्या भाषणानंतर पालकमंत्री आबिटकर व महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्र्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!