पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता


पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा अखेर निकाल लागला
मुंबई
तत्कालीन काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांच्या 2006 मधील दुहेरी हत्या प्रकरणात, पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.या प्रकरणात एकूण 9 जणांना अटक करण्यात आली होती.
सीबीआय आता कोर्टाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत
.मागील २० वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. ३ जून २००६ रोजी मुंबईच्या कळंबोली परिसरात काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा चालक समद काझी हेही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते.
पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नाही, असं न्यायमूर्तींनी म्हटलं. या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही. हा धागा सरकारी पक्षासाठी महत्वाचा होता. मात्र वारंवार जबाब बदलल्याने माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही. संशयाचा फायदा घेऊन गुन्हा सिद्ध होत नाही. सर्व आरोपी्ना न्यायालय मुक्त करत आहे, असा निकाल कोर्टाने दिला.
मागील २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात निकाल द्यायला उशीर झाल्याने न्यायाधीशांनी सर्वप्रथम माफी मागितली. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली. ही सगळी सुनावणी माफीचा साक्षीदारावर अवलंबून आहे. आरोपी क्रमांक तीन माफीचा साक्षीदार बनल्याने हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.
2002 नंतर मयत पवनराजे निंबाळकर आणि आरोपी क्रमांक पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय वैर निर्माण झालं. दोघंही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते. विधानसभेत एकमेकांच्या विरोधात लढले. यात मयत यांचा पराभव झाला या निवडणुकीत पवनराजेंनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप झाला. यानंतर दोघांमध्ये वैर वाढलं, अशी माहिती माफीच्या साक्षीदारांकडून देण्यात आली. पारसमैल जैन हा माफीचा साक्षीदार असून पोलिसांनी त्याला मुंब्रा परिसरात ताब्यात घेण्यात आलं होतं.
या प्रकरणी कोर्टाने १२७ जणांच्या साक्षी तपासल्या. २००३ मध्ये पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे दिली होती. ही तक्रार अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ असल्याचंही न्यायालयाने म्हटलं.
माफीचा साक्षीदार असलेल्या जैन याला गुन्हे शाखेनं ८ सप्टेंबर २००९ ला ताब्यात घेतलं मात्र २५ सप्टेंबरला अटक दाखवली. सुरुवातीला १५ दिवस त्याला मारहाण केली. औषधं बंद करण्यात आली आणि त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला, असं कोर्टाने म्हटलं. पारसमल जैन आणि इतर आरोपींची जबाब प्रश्न न विचारता घेतले. त्यामुळे या संपूर्ण तपासावर संशयाचं धुकं निर्माण झालं आहे.
सीबीआयने आरोप पत्रात पवनराजे यांनी पद्मसिंह पाटील यांच्यापासून जीवाला धोका असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. हे पत्र आरोप पत्रात लावलं आहे. मात्र हे पत्र कुठून आलं? याबाबत सीबीआयने काहीही तपास केला नाही. आताही सीबीआयला याचं उत्तर देता आलं नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. तसेच कोर्टानं माफीचा साक्षीदार फितूर झाला. त्याचा पहिला कबुली जबाब आणि दुसरा कबुली जबाब यात विसंगती असल्याचं देखील कोर्टानं म्हटलं.
घटनेच्या दिवशी आपण घटनास्थळी नव्हतो. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असंही माफीच्या साक्षीदाराने सांगितलं. त्याने वारंवार साक्ष बदलली. त्याची साक्ष घेताना प्रक्रियेचं पालन केलं नाही. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे त्याच्यावर दबाव होता. त्यामुळे त्याची साक्ष ग्राह्य धरण्यासारखी नाही. त्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाची भिस्त ज्या माफीच्या साक्षीदारावर होती, त्यालाच कोर्टाने फितूर ठरवलं आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!