साहित्य संमेलने वाचक केंद्रित व्हावीत -विनय हर्डीकर
आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मीतर्फे विनोद कुलकर्णी यांचा सत्कार
सातारा
सर्व छोटी-मोठी साहित्य संमेलने वाचक केंद्रित व्हावीत.तसेच संस्थावर कोणाचीही मक्तेदारी असू नये. तसेच एक वर्ष पुरस्कार बंद करून वाचलेला निधी जिल्हास्तरावर संमेलनासाठी वापरावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक विनय हर्डीकर यांनी व्यक्त केली
आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांनी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात विनोद कुलकर्णी यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक विनय हर्डीकर यांनी विनोद कुलकर्णी यांचा सत्कार केला तेव्हा ते बोलत होते
साहित्य चळवळीबद्दल आपले परखड विचार व्यक्त करताना हर्डीकर म्हणाले सर्व छोटी-मोठी साहित्य संमेलने वाचक केंद्रित व्हावीत.समाजात धार्मिक पुस्तकांचा खप वाढत आहे ही खेदजनक बाब आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विनोद कुलकर्णी,मिलिंद जोशी यांच्यासारखे तरुण कार्यक्षम नेतृत्व पुढील ३ वर्षासाठी लाभल्याने अमुलाग्र बदल होऊन मुंबई,पुणे,नाशिक,औरंगाबाद या शहरांबरोबर बाकीच्या सर्व जिल्ह्यात साहित्यिक वातावरण वाचकांपर्यंत पोहोचेल असा माझा ठाम विश्वास आहे.
आज कालच्या साहित्य संमेलनाला पूर्वीची रया राहिली नाही. ती विनोद कुलकर्णी यांनी परत आणावी व संमेलने लोकाभिमुख व्हावीत अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डाॅ.सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी केले.
शिरीष चिटणीस यांनी आपल्या मनोगतात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे नूतन कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांच्या नियुक्तीचा सर्व सातारकरांना अभिमान आहे असे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची २०११ मध्ये शाहूपुरी शाखा स्थापन करून सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला त्यांनी उर्जितावस्ता आणली. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून काम करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यामुळेच त्यांना ही नवीन जबाबदारी मिळाली. असे शिरीष चिटणीस म्हणाले.
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ. संदीप श्रोत्री यांनी आपल्या मनोगतात विनोद कुलकर्णी यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आहे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर डाॅ. सुनीलकुमार लवटे आणि विनय हर्डीकर यांनी शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कारमूर्ती विनोद कुलकर्णी यांचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना या सर्व जबाबदाऱ्या माझ्या मनात नव्हत्या असे मोकळेपणांनी विनोद कुलकर्णी म्हणाले. सुरुवातीला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा स्थापना करताना साताऱ्यातील साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी एवढाच विचार होता. त्यानंतर नवीन जबाबदाऱ्या येत गेल्या आणि त्या मी स्वीकारल्या आणि निस्पृह भावनेने त्या पार पाडल्या. साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या परिणामकारक कामगिरीचा उल्लेख करताना ते विनम्रपणे म्हणाले की यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यांनी जेष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, नंदकुमार सावंत यांचा उल्लेख केला. आजच्या समारंभात महामंडळाच्या कामकाजाबद्दल ज्या अपेक्षा व्यक्त झाल्या त्याची विनम्रपणे नोंद घेत आहे असे ते म्हणाले. योग्य व्यक्तींकडून सत्कार आणि घरचा सत्कार या दुहेरी गोष्टीमुळे सत्कार स्वीकारताना ते भावुक झाले होते.
दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास किशोर बेडकीहाळ, डॉ राजेंद्र माने, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. सुहास जोशी,विद्या पोळ, नंदकुमार सावंत, अनिल जठार, रविंद्र शिवदे, आनंद ननावरे,महेश गायकवाड,ऋषिकेश सारडा आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.
फोटो ओळ
विनोद कुलकर्णी यांचा सत्कार करताना विनय हर्डीकर व प्राचार्य डॉ सुनिलकुमार लवटे,डावीकडून विनायक भोसले, श्रीराम नानल, डॉक्टर संदीप श्रोत्री व शिरीष चिटणीस

