पसायदान पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात


बाळासाहेब लबडे यांच्या ‘बुटक्यांचे बेट’ या कादंबरीचे प्रकाशन

Advertisement

प्रतिनिधी :
पसायदान प्रतिष्ठान, गुहागर (जि. रत्नागिरी) आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान व पुस्तक प्रकाशन समारंभ दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, सातारा येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद कोपर्डे, प्रसिद्ध लेखक शिरीष चिटणीस, ज्येष्ठ कवी प्रा. महादेव रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पसायदान प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्मृतिशेष डॉ. गंगानाथ कोतापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ या कादंबरीला, श्री. भारत सासणे उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार अनंता सूर यांच्या ‘खांदे मळणी’ या कथासंग्रहाला प्रदान करण्यात आला. तसेच पसायदान राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार चंद्रकांत बाबर यांच्या ‘यास्मिन आणि इतर दीर्घ कविता’, सौ. सोनिया पाटील यांच्या ‘थिजलेल्या माणुसकीचा गहिवर’ आणि रचना यांच्या ‘पुष्पगुच्छ’ या कवितासंग्रहांना प्रदान करण्यात आला.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब लबडे लिखित ‘बुटक्यांचे बेट’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.
कादंबरीविषयी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद कोपर्डे म्हणाले, “या कादंबरीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची मूल्यदृष्टी. आंबेडकर, गांधी, संत तुकाराम आणि मार्क्स यांच्या वैचारिक चौकटीचा स्वीकार या कादंबरीने केला आहे. कादंबरीचा शेवटही या विचारांच्या आशयपूर्ण संगतीत होतो आणि त्याला संत तुकारामांच्या विचारांची जोड दिली आहे. या संघर्षात अखेरीस मानवी मूल्यांचाच विजय होतो, असा आत्मविश्वास आणि आशावाद लेखक व्यक्त करतो. त्यामुळे ही कादंबरी आशावादी ठरते.”
“‘बुटक्यांचे बेट’ वाचताना वाचकाला केवळ कथा मिळत नाही, तर समाजाकडे नव्या नजरेने पाहण्याची दृष्टी मिळते. ही कादंबरी प्रश्न विचारते, अस्वस्थ करते आणि विचारांना चालना देते. लोकशाही, स्वातंत्र्य, विकास, विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक व्यवस्थेचे अनेक मूलभूत प्रश्न ती उपस्थित करते. कादंबरी संपल्यानंतरही हे प्रश्न वाचकाच्या मनात दीर्घकाळ घोळत राहतात. त्यामुळे ही कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी,” असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात भारत सासणे म्हणाले, “‘बुटक्यांचे बेट’ ही नाविन्यपूर्ण, सूचक आणि वैश्विक आशयाची कादंबरी आहे. तिला कथनाची गती असून आशयाला खोली आणि उंची लाभली आहे. तिच्यातील प्रतीकात्मकता आणि रूपकात्मकता अत्यंत प्रभावी आहे. आजच्या काळातील जवळपास सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना कादंबरीने स्पर्श केला आहे. स्थानिक संदर्भांना लेखकाने वैश्विक परिमाण दिले आहे. विषय, शैली आणि आशयातील वेगळेपणामुळे ही कादंबरी महान म्हणण्या पर्यंत विशेष ठरते. वाचकांनी ही कादंबरी अवश्य वाचावी.”
याप्रसंगी लेखक बाळासाहेब लबडे यांनी पसायदान प्रतिष्ठानच्या सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले. तसेच ‘बुटक्यांचे बेट’ या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी थोडक्यात माहिती दिली.पुरस्कार प्रदान समारंभाचे तसेच कादंबरी प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय बोरुडे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. महादेव रोकडे यांनी केले. साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि वाचक यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!