जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया मुक्ती संकल्प सप्ताह


आठ मे पर्यंत जागृती, तपासणी, प्रशिक्षण, समुपदेशन
साताराः
थॅलेसेमिया या घातक आजाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने थॅलेसेमिया मुक्ती संकल्प सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत एक ते आठ मेदरम्यान गर्भवती महिलांची तपासणी, समुपदेशन, आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती असे उपक्रम होणार आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उल्का झेंडे आणि रुधिरविज्ञान विभागप्रमुख डॉ. शुभांगी मोरे यांनी दिली.
थॅलेसेमिया हा अनुवंशिकतेने होणारा दुर्धर आजार असून, या आजारात रुग्णाच्या शरीरातील रक्त निर्माण करण्याची क्षमता नष्ट होते. अशा रुग्णांना सातत्याने रक्त द्यावे लागते. रक्तपेढ्यांकडून रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी अशा रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडून ओळखपत्र दिले जाते. स्त्री आणि पुरुष असे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (मेजर) असू शकतात; तथापि विवाहापूर्वी त्या दृष्टीने तपासणी केली जात नाही. पती आणि पत्नी यांपैकी एकजण वाहक असल्यास धोका नसतो; परंतु दोघेही वाहक असतील तर त्यांच्या अपत्याला थॅलेसेमिया होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच गर्भारपणात महिलांनी थॅलेसेमिया तपासणी करून घ्यावी, असा सल्ला दिला जातो. महिला या आजाराची वाहक असल्याचे स्पष्ट झाल्यास पतीची रक्ततपासणी केली जाते आणि अपत्याला थॅलेसेमिया होण्याची संभाव्यता पाहून पुढील सल्ला दिला जातो.
जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित सप्ताहांतर्गत आरोग्य कर्मचारी थॅलेसेमिया मुक्तीची शपथ घेणार आहेत. ‘टेस्ट बिफोर मॅरेज’ या थीमवर आधारित जनजागृतीसाठी महाविद्यालयांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, विविध माध्यमांतून युवकांना माहिती दिली जाणार आहे. आशा, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. थॅलेसेमिया रुग्णांना सहाय्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, मोफत औषधोपचारही दिले जाणार आहेत. गर्भवती महिलांनी गर्भ तीन महिन्यांचा होण्यापूर्वीच थॅलेसेमिया तपासणी करून घेणे आवश्यक असते आणि त्या दृष्टीने या सप्ताहाचा त्यांना लाभ होणार आहे. तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पुढील पिढी थॅलेसेमियामुक्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!