एका अष्टपैलू सुराचा अस्त
आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीवर शोककळा
मुंबई
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसलेयांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल ८ दशकं त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन , ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ सारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली.
आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. 1950 च्या दशकात त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केलं. त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पदमविभूषणसारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

