साताऱ्यात १४ एप्रिलपासून वार्षिक कला प्रदर्शन
विविध प्रात्यक्षिके आणि मुलाखतींची मेजवानी
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि संस्कृती कला अकादमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यामाने ‘रंग लोकसंस्कृतीचे’ या वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सभागृहात (कन्याशाळेच्या मागे) पार पडणार असल्याची माहिती संस्कृती कला अकादमीचे प्रमुख प्रसाद चव्हाण यांनी दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सातारा येथील प्रख्यात शास्त्रीय नृत्य गुरु वैशाली पारसनीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, लोकमतचे संपादक हणमंत पाटील, जीईएस कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ आणि पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर दुपारी १२ वाजता प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांचे चित्रप्रात्यक्षिक होणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कलाप्रेमींसाठी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
१५ एप्रिल (बुधवार): सकाळी ११ वाजता शिल्पकार सूरज कुंभार यांचे शिल्प प्रात्यक्षिक होईल. दुपारी ४:३० वाजता कला संवाद अंतर्गत जोगती करण प्रभाळे आणि गोंधळी विष्णू कदम (सांगली) यांची मुलाखत नृत्यदिग्दर्शक राजेंद्र संकपाळ घेणार आहेत.
१६ एप्रिल (गुरुवार): दुपारी ४:३० वाजता सचिन वाघ भटकंती गडकिल्ल्यांची’ या विषयावर ऐतिहासिक अनुभव आणि दृकश्राव्य सादरीकरण करणार आहेत.
१७ एप्रिल (शुक्रवार): सकाळी ११ वाजता . दिलीप भट्टड यांचे चित्रप्रात्यक्षिक होईल. सायंकाळी ५:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. यावेळी नगरसेवक सागर पावशे व शिरीष चिटणीस, प्रा विजयकुमार धुमाळ, राजेश निकम इतर मान्यवर उपस्थित राहतील.
१८ एप्रिल (शनिवार): प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार मंगेश शिंदे यांचे चित्रमात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.
साताऱ्यातील जास्तीत जास्त कलाप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या कलाप्रदर्शनाचा व प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसाद चव्हाण आणि एकांक नलवडे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

