रोहित पवारांचे एका एजन्सीला पाच कोटी रुपयांचे पॅकेज:सुरज चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी,बदनाम करण्यासाठी कारस्थान
मुंबई
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बदनाम करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे पॅकेज हे एका एजन्सीला दिले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांच्या नेमणूका केल्या आहेत म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम करत आहेत असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तुतारी गटाकडून सातत्याने केला जात आहे. तुतारी गटाचे स्वतः च्या पक्षाकडे जेवढे लक्ष नाही तेवढे लक्ष आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट कशी पडेल राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम कसा होईल असा प्रयत्न केला जात आहे असाही आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे.
तुतारी गटाच्या एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी एक बातमी सोडली की पक्षाच्या घटनेतून काही फ्रंटल वगळण्यात आले. त्यामध्ये ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल किंवा इतर सेल असतील अशी अर्धवट माहिती माध्यमांना दिली आहे. आमच्या घटनेत पक्ष स्थापनेपासून फ्रंटलचे पाच विभाग आहेत. फ्रंटलमध्ये फादर बॉडी, महिला कॉग्रेस, युवक, विद्यार्थी, सेवादल यांचा समावेश आहे. हेच दाखवून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम तुतारी गटाने केले आहे. त्यांनी ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेल हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले आहे असा खोटा बनाव केला आहे. हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते तर ते सेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते असे स्पष्ट करताना सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना दाखवताना निवडणूक आयोगाला दिलेले पत्राची प्रत माध्यमांना दाखवली. मात्र माध्यमांना जी माहिती देण्यात आली ती कलम ३० ची देण्यात आली. त्यात कलम २८ चा पेपर वगळण्यात आला आहे. कलम २८.१ मध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान, यासह जितके काही सेल आहेत त्यांचा समावेश आहे आणि याची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे हे सर्व आजचे नाही तर पक्ष स्थापन झाल्यानंतरची घटना आहे. परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस कसा अडचणीत येईल… पक्षाची कशी बदनामी होईल… पक्षाची प्रतिमा मलिन कशी होईल असा प्रयत्न रोहित पवार यांच्या टीमकडून केला जात आहे असाही थेट हल्लाबोल सुरज चव्हाण यांनी केला.
रोहित पवार आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर लक्ष देण्याऐवजी तुमच्या आमदार, खासदारांवर लक्ष द्या. मोहोळचे तुमचे आमदार कोणत्या पक्षाचे कार्यक्रम घेतात. सोलापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार कुठल्या पक्षाच्या बॅनरखाली काम करतात याकडे लक्ष द्या आणि मग आमच्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्लाही सुरज चव्हाण यांनी दिला.
आमच्या पक्षाचे प्रश्न सोडविण्यासाठी… आमच्या पक्षातील कोण चुकला तर तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात लुडबुड करु नये अशी विनंती करतानाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकाटिप्पणी केली तर जशास तसे उत्तर आमच्याकडून दिले जाईल असा इशाराही सुरज चव्हाण यांनी दिला आहे.

