महिला उद्योजिकांचा प्रवास दिशादर्शक:वेदांतिकाराजे
दीपा पराग काटदरे यांना गुणवंत महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान
सातारा
उद्योग क्षेत्रामध्ये महिला उद्योजिकांचा प्रवास आणि काम नेहमीच दिशादर्शक असते. सातारच्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख महिला उद्योजिका दीपा पराग काटदरे यांनी सुद्धा आदर्श काम करून इतर महिलांसाठी आदर्श घालून दिला आहे अशा शब्दात श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराराजे भोसले, वहिनीसाहेब यांनी गौरव केला
येथील गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांच्या विद्यमाने गुणवंत महिला उद्योजिका पुरस्कार 2026 काटदरे फूड प्रॉडक्ट्स व दीपा फूड्स सातारा यांच्या डायरेक्टर दीपा पराग काटदरे यांना प्रदान करण्यात आला तेव्हा प्रमुख पाहुण्या म्हणून वेदांतिकाराजे बोलत होत्या
या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे उपस्थित होते
यावेळी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते दीपा पराग काटदरे यांना मानपत्र,शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वेदांतिकाराजे पुढे म्हणाल्या, आपले दैनंदिन संसारिक आयुष्य सांभाळून महिला जेव्हा यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे येतात तेव्हा ती निश्चितच एक समाधानाची आणि आदर्श अशी बाब असते. दीपा काटदरे यांनी त्याच प्रकारे औद्योगिक प्रवास घडवला आहे. आज 200 पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगार देण्याचे काम काढदरे उद्योग समूह करत आहे आणि सातारच्या या उद्योगाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि परदेशातही नाव कमावले आहे.
सत्काराला उत्तर देताना दीपा पराग काटदरे यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडला. पती आणि सासू-सासरे यांच्या सहकार्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी यशस्वी उद्योजिका होऊ शकले असे त्या म्हणाल्या. आगामी कालावधीमध्ये काटदरे उद्योग समूहाचा विस्तार करून 1000 कुटुंबांपर्यंत हा विकास नेण्याचा मनोदय असल्याचीही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी आपल्या भाषणामध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली .यशस्वी उद्योजक आणि गुणवंत कामगार यांचा सन्मान करून आमचे प्रतिष्ठान औद्योगिक विकासाला हातभार लावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक दिलीप चरेगावकर यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचा उल्लेख केला आणि मानपत्राचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे आणखी एक संस्थापक गोपाळ खजुरे यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सल्लागार इकबाल काझी यांनी केले
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातील पाठक हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक रघुवीर आपटे, दादासाहेब काळे,संजय पवार , शरदराव वाघमळे, हेमंत ढवळे,काटदरे कुटुंबीय, रविंद्र झुटिंग भारती, मुकुंद फडके, गौतम भोसले,प्रशांत तरडे, राजेंद्र गरगटे, अजित देशपांडे आणि साताऱ्यातील मान्यवर उपस्थित होते .
यावेळी दीपा पराग काटदरे यांच्या सासू-सासर्यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
फोटो ओळ
दीपा पराग काटदरे यांना मानपत्र देताना श्रीमंत छत्रपती सौभाग्यवती वेदांतीका राजे भोसले, शेजारी दिलीप चरेगावकर, जयंत देशपांडे ,गोपाळ खजुरे इकबाल काझी.

