पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल


विद्रोही संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांचे आवाहन

सातारा
देशातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण सध्या फारच गढूळ झाले आहे. या देशाला या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायचे असेल तर सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. आणि जनतेला बरोबर घेऊन पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल असे आवाहन सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी सातारा येथे त्यांच्या सत्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात केले.

Advertisement

पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारच्या वतीने शाहीर संभाजी भगत यांचा सातारा येथील दैवज्ञ सांस्कृतिक भवन मंगल कार्यालयात पद्मश्री लक्ष्मण माने व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य अध्यक्ष कॉ धनाजी गुरव व सरचिटणीस डॉ जालिंदर घीगे , संयोजन समितीचे अध्यक्ष ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे हे उपस्थित होते. त्यावेळी शाहीर संभाजी भगत बोलत होते.
यावेळी कार्याध्यक्ष विजय मांडके , सरचिटणीस एडवोकेट राजेंद्र गलांडे , प्रा मंगला आनंद साठे व प्रा डॉ मृणालिनी आहेर हे विचारमंचावर उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून सातारा येथे हे संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाहीर संभाजी भगत हे प्रथमच सातारा आल्यानंतर त्यांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिमा , भारतीय संविधानाची प्रास्ताविका , विद्रोहीचे सन्मानचिन्ह , डॉ भारत पाटणकर लिखित विद्रोहीचे धोरण व जाहीरनामा आणि शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जनतेला बरोबर घेऊनच आपल्याला सांस्कृतिक राजकारण करावे लागणार आहे. उच्चवर्गीय , उच्चवर्णीय व पुरुषसत्ताक सांस्कृतिक राजकारणाला पर्यायी संस्कृतिक राजकारण उभे करूनच उत्तर द्यावे लागणार आहे असे सांगून शाहीर संभाजी भगत म्हणाले की धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या सक्षम पायावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ उभी राहिली आहे .आणि आपण जनतेला बरोबर घेऊन पर्यायी संस्कृतिक राजकारण नक्कीच यशस्वी करू असा विश्वास आहे.
यावेळी बोलताना डॉ भारत पाटणकर म्हणाले ,विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्याचा आढावा घेताना यंदा सातारच्या प्रतिसरकारच्या भुमित हे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत आहे हे महत्त्वाचे आहे कारण आत्ताच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एल्गार करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि हीच योग्य संधी आहे.
पद्मश्री लक्ष्मण माने यांनी साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सध्या जी मुस्कटदाबी सुरू आहे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणे सुरू आहे त्याबद्दल खेद व्यक्त करून सर्व ताकदीनिशी आपण या प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी मी आपल्या बरोबर आहे असा विश्वास दिला.
ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे यांनी संयोजन समितीच्या वतीने संभाजी भगत यांना हे संमेलन आम्ही सर्वांना बरोबर घेऊन यशस्वी करू असा विश्वास दिला.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी प्रास्ताविकात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या आतापर्यंत झालेल्या संमेलनाचा व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या इतरही उपक्रमांचा आढावा घेतला.
संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.
आभार एडवोकेट राजेंद्र गलांडे यांनी मानले.
यावेळी नंदकुमार ढाणे , भगवान अवघडे , जयंत उथळे , डॉ प्रशांत पन्हाळकर, प्राचार्य डॉ अरुण गाडे , एडवोकेट शरद जांभळे , प्रा कविता म्हेत्रे , कॉ प्रमोद परमणे , कॉ शंकर पाटील , शैला यादव , जयवंत खराडे , संजय गाडे , गणेश भिसे , प्रा डॉ आर के चव्हाण , दिलीप भोसले , वामनराव गंगावणे, प्रियांका गडदे , शाहीर श्रीरंग रणदिवे, अहमद कागदी,हणमंत सावंत , प्रा डॉ विजय पवार , जनार्दन घाडगे , दिलीप महादार , प्रा डॉ रामचंद्र ननावरे , प्रा गौतम काटकर व त्यांचे सहकारी , संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
सातारा येथे आल्यानंतर संभाजी भागात यांनी ज्येष्ठ विचारवंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा डॉ आ.ह. साळुंखे यांच्या लोकायत या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संमेलनाच्या अनुषंगाने व सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल दोन्ही मान्यवरांनी यावेळी चर्चा केली.

फोटो
१५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाहीर संभाजी भगत यांचा सत्कार करताना पद्मश्री लक्ष्मण माने व डॉ भारत पाटणकर शेजारी कॉ धनाजी गुरव , हभप डॉ सुहास महाराज फडतरे, डॉ जालिंदर घीगे , विजय मांडके


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!