नटराज मंदिरात वार्षिक भजन मेळावा


२६ जून ते ३० जूनपर्यंत पाच दिवस आयोजन;अन्नदानही होणार

Advertisement

सातारा : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात २६ जूनपासून रविवारपर्यंत (दि. ३०) होणाऱ्या वार्षिक भजन मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. या मेळाव्याला येणाऱ्या भाविकांसाठी पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप तयार करण्यात आला असून सलग पाच दिवस अल्पोपहारासह दोन वेळ मोफत अन्नदान केले जाणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चेन्नई येथील भगवंत नाम प्रचार मंडळीच्या वतीने २१ वा वार्षिक भजन महोत्सव साताऱ्यात होत आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मंदिरात पत्रकार परिषद झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक गोपी भागवत, श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, नारायण राव आदी उपस्थित होते. श्री कांची कामकोटी मुलम्यान सर्वज्ञ पीठम, कांचीपुरुमचे प पू शंकराचार्य, श्री श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी, प पू श्री श्री श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी व विद्यमान पीठाधीश्वर प पू श्री श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मंदिरात व मंदिराबाहेर पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामधील सभामंडपामध्ये दररोज भजनसेवा होईल. मंदिराबाहेरील हॉलमध्ये अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री मोफत अन्नदान होईल. मेळावा कालावधीत विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध मान्यवर मेळाव्यात भेट देणार आहेत.
दरम्यान, या मेळाव्यात सकाळी सात ते दुपारी एक तसेच संध्याकाळी तीन ते रात्री साडेआठ या वेळेत जेष्ठ भागवतकरांकडून भजनसेवा होईल. दि. २६ ते २८ जूनदरम्यान सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत महारुद्र अनुष्ठान होणार आहे. दि. २८ जून रोजी महारुद्र अनुष्ठानाची होम-हवनाने सांगता होईल. दि. ३० जून रोजी श्री राधा कृष्ण कल्याणम (लग्न सोहळा) व प पू शंकराचार्य, श्री श्री श्री महास्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना पुष्प लक्षार्चना नियोजित आहे. सर्व भाविक भक्तांनी या भजन मेळाव्यास उपस्थित राहून श्री शिवकामसुंदरी व आनंद नटराज आणि प पू शंकराचार्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!