रविवारी पुण्यात २१ वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन
साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
सातारा
सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व कोथरूड (पुणे) येथील भारतीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १५) पुण्यात २१ वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन होत असून त्यानिमित्त कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे.
गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य सचिव व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. जयसिंग कळके, संस्थेचे महासंचालक डॉ. प्रकाश साळवी यांनी ही माहिती दिली. जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्र, सर्वे नं. ६८, एकलव्य पॉलिटेक्निकमागे, कोथरूड (पुणे) या ठिकाणी हे साहित्य संमेलन होणार असून संमेलनस्थळाला पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक साहित्यनगरी, तर व्यासपीठाला कवी नारायण सुर्वे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार हे संमेलनाचे उद्घाटक असून प्रसिद्ध गझलकार डॉ. सुनंदा शेळके संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी राजर्षी शाहू महाराजांचा पोवाडा सादर करणार आहेत. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विजय उत्तुरे, भारतीय शिक्षण संस्थेचे प्र. अध्यक्ष डॉ. उदयकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांची प्रकाशने होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात सकाळी साडेअकरा वाजता भारत आर्षेय संस्थान (पुणे) चे संचालक व ज्येष्ठ संगीतकार प्रा. डॉ. शुब्रोतो रॉय यांच्या धृपद गायनाची सुरेल मैफल रंगणार आहे. दुपारी १२.३० वाजता ‘भारतीय ज्ञानपरंपरा आणि अभिजात मराठी’ विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये प्रा. सुनील पवार (बुलढाणा), श्रीकांत ढेरंगे (आळेफाटा), रचना (पाथर्डी), रूपाली अवचरे (पुणे), सुनील उंब्रजकर (पुणे) सहभागी होणार आहेत.
दुपारी २.१० वाजता ‘छत्रपतींच्या सौ. अर्थात पुतळाबाई’ हा एकपात्री प्रयोग प्रा. डॉ. मीना आहेर सादर करतील. पुतळाबाईंच्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा हा अनोखा प्रयोग आवर्जून पहावा असा आहे. त्यानंतर २.३० वाजता प्रसिद्ध कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या कथाकथनाचा आनंद साहित्य रसिकांना घेता येणार आहे. दुपारी ३.३० वाजता मंगसुळी (जि. बेळगाव) येथील कवी आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. त्यात ॲड. हणमंत शिंदे, स्वाती बाजारे, श्वेता कुलकर्णी, डॉ. संतोष गाढवे, डॉ. आप्पासाहेब पाटील, प्रवीण सुतार, भूपेंद्र आल्हाट, अलका सुनगर, मोहन राठोड, बालाप्रसाद चव्हाण, प्रा. विक्रम शिंदे, डॉ. संजय बोरुडे, प्रा. डॉ. सुनंदा शेळके, विलास कुंभार, राधामावशी वाघमारे कविता सादर करणार आहेत.
सायंकाळी साडेचार वाजता संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, डॉ. संजय बोरुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप समारंभ होणार असून त्यामध्ये गुंफण पुरस्कार वितरण व माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. साहित्य रसिकांनी या मायमराठीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

