कवी महेश खरात यांनी सौंदर्यवादाचा प्रवाह पुनरुज्जीवित केला
कवितासंग्रह प्रकाशन समारंभात डॉ. देवानंद सोनटक्के यांचे प्रतिपादन
सातारा
अभिजातवादाच्या नियमबद्धतेची प्रतिक्रिया म्हणून पाश्चात्य देशात सौंदर्यवाद आला. मराठीत तो पहिल्यांदा केशवसुतांनी आणला. मानवी भावनेने विश्वाचे आकलन होते, भावना आणि निसर्गसौंदर्य यांचा मिलाफ त्यात होता. बालकवींचा निसर्ग परदेशी तर ना. धों. महानोर यांचा अस्सल देशी होता. कवी महेश खरात यांची कविता ना. धों.शी नाते सांगणारी आणि नव्वदोत्तर मराठी कवितेत सौंदर्यवाद पुनरुज्जीवित करणारी आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द समीक्षक डॉ. देवानंद सोनटक्के यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांच्या वतीने डॉ.महेश खरात यांच्या “तुझ्या नावासमोर प्रिय लिहिताना” या कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते वसुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व उद्योजक डॉ.डी.एस.काटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाले.तेव्हा ते बोलत होते
डॉ. देवानंद सोनटक्के म्हणाले, कवी महेश खरात यांच्या कवितेत प्रेमाची विलोभनीय रूपे आहेत. मराठी प्रेमकविता केशवसुत, गोविंदाग्रज, मर्ढेकर ते नारायण सुर्वे अशा विविध टप्प्यांवर बदलत गेलेली आहे. चित्रांनी तिला अस्तित्ववादी, सुर्व्यानी मार्क्सवादी, नेमाड्यांनी देशीवादी रूप दिले. कवी महेश खरात यांची कविता ना. धों. महानोरांच्या निसर्गाशी नाते सांगत प्रेयसी, आई, बहिण, पत्नी अशी विविध नात्यांचा शोध घेत जाणारी व प्रेमाची विलोभनीय रूपे रेखाटणारी आहे.
कवयित्री मृणालिनी पवार – गायकवाड म्हणाल्या ‘ तिच्या नावासमोर प्रिय लिहिताना ‘ हा कवी महेश खरात यांचा कवितासंग्रह वाचनीय व पुरोगामी विचार देणारा, समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे.स्त्री जीवनाची बंदिस्त व काळी बाजू संवेदनशीलतेने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.’ प्रेम ‘ या नैसर्गिक, अव्यक्त भावनेचे मनोव्यापार कवितेच्या रुपात शब्दबद्ध करण्याचा धाडसी व यशस्वी प्रयोग कवीने या काव्यसंग्रहात केला आहे.
लेखिका सीमंतिनी नूलकर म्हणाल्या,या कवितासंग्रहात ‘प्रिय’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे आणि ती मर्यादित स्वरूपात कवीला अभिप्रेत नाही. प्रिय असणं या भावनेची व्याख्या करणं काही सोपं नाही. ती एक नैसर्गिक, सेंद्रिय,सहजस्फूर्त,प्रामाणिक भावना आहे.शेकडो वर्षांमध्ये सामाजिक स्थित्यंतरं झाली आणि स्त्रीचं आयुष्य त्याच्याशी जखडलेलं राहिलेलं आहे. तिचं स्थान, तिच्या भावना, ती प्रिय असणं,नसणं असं बरंच काही कवीच्या संवेदनशील मनाने या संग्रहात टिपलेलं आहे
“तुझ्या नावासमोर प्रिय लिहिताना…” हा कवितासंग्रह म्हणजे स्त्रीविषयक कृतज्ञता, सृष्टीच्या चैतन्याची चलरुपे, वात्सल्यभाव व संवेदनात्मकतेचे अनेक पदर असणारा सहजसोप्या भाषेतील काव्य आविष्कार आहे, असे मत छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक, साहित्यिक अर्थतज्ञ डॉ. डी. एस. काटे यांनी व्यक्त केले
महेश खरात हे अभ्यासू प्राध्यापक, फर्डे वक्ते व उत्तम संयोजक असल्याचे ज्ञात होते, मात्र या कवितासंग्रहाद्वारे ते सर्वोत्तम कवी सुद्धा आहेत हे सिद्ध होते, असे गौरवोद्गार विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात काढले. तसेच साहित्याच्या प्रांतातील कथा, कविता, कादंबरी यांच्या बरोबरीनेच वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रा. डॉ. खरात यांची मुशाफिरी कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैशाली राजमाने यांनी त्यांच्या साहित्यातील संशोधनकार्यासाठी अभ्यासलेल्या स्त्रीविषयक कवितांमध्ये डॉ. खरात यांच्या कविता सर्वाधिक भावल्याचे सांगितले.
शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविकात प्रा. डॉ. महेश खरात यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच्या लेखन भरारीचे कौतुक करत विविध ठिकाणच्या नवोदित व जेष्ठ साहित्यिकांचे कौतुक करण्यात दीप लक्ष्मी परिवार सातत्याने सक्रिय राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास युवराज पवार, सौ. दीपाली चरेगावकर, जयंत लंगडे आदिंसह सातारा परिसरातील साहित्यप्रेमी तसेच छ. संभाजीनगरहून आलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
हनुमंत सोनवणे यांनी आभार मानले.

