लिटिल मास्टर नाबाद ७५


विशेष लेख/शरद महाजनी

Advertisement

लिटिल मास्टर सुनील गावसकर ७५ वर्षांचा झाला. खरे तर जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून त्याची ओळख ,दरारा आहे, पण तरीही आमची पिढी त्याला सुनील म्हणूनच ओळखते, इतका तो भारतीय जनतेच्या मनात रुजला आहे.माझ्या पत्रकारितेच्या काळात सुनीलच्या भेटींची हॅट्ट्रिक साधण्याची संधी मिळाली.शिवाय त्याला प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहण्याची संधी पण मिळाली
१९६९ मध्ये त्याला मी प्रथम पाहिले ते ब्रेबर्न स्टेडियमवर. मुंबई -राजस्थान या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात.माझे भास्करमामा बरोबर होते.मुंबईचा संघ कसोटी खेळाडूंनी भरला होता. राजस्थानचे नेतृत्व राजसिंग डुंगरपूर करत होते. हनुमंतसिंग, लक्ष्मण सिंग, कैलाश गटानी, चंदू जोशी असे नावाजलेले खेळाडू होते.अजित वाडेकर यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अशोक मांकड,सुनील गावसकर ही सलामीची जोडी मैदानात उतरली. प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा साहजिक मुंबई संघाला मिळत होती.तंत्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या सुनीलने माझे लक्ष वेधून घेतले.त्याची खेळी पाहताना मला मामा सांगत होता, हा भारतीय संघाचा भावी सलामीवीर बरं!त्या सामन्यात सुनील, अशोक यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली.त्यानंतर सुनीलची घोडदौड सुरू झाली. त्याच दरम्यान सुनीलच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. जगू मुळे हा माझा मित्र त्याचा फॅन होता. विद्यापीठ संघातून सुनील प्रथम खेळला अशी माहिती देत त्याने त्याची सारी माहिती पुरवली.१९७१मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता. सर गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, हॉल,ग्रिफिथ असा जलदगती गोलंदाजांचा तोफखाना होता.इकडे सुनील मात्र या तोफखान्याला सामोरे जाताना भक्कमपणे उभा होता. त्या मालिकेत एका द्विशतकासह सुनीलने तब्बल ७७४ धावा केल्या होत्या.ती मालिका आपण जिंकली. मग इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकून भारताने दबदबा निर्माण केला होता.
त्यानंतर मी सुनीलला पुण्यात नेहरू स्टेडियमवर भारत- पाकिस्तान सामन्यात पाहिले.पत्रकार म्हणून प्रेस बॉक्समध्ये बसून वार्तांकन केलेला तो पहिला सामना.आम्ही आपल्या जागा शोधत असताना लक्ष गेले तेव्हा सुनील धावबाद होऊन परत येत होता. रमण लंबा याने चुकीचा कॉल दिल्याने सुनील बाद झाला.भारतीय संघ १२५ धावा करून बाद झाला. मग जावेद
मियाँदाद, सलीम मलिक यांनी मस्त खेळ करून सामना जिंकला. इम्रान खान आणि काही नामवंत खेळाडू पाक संघात होते. अर्थात, हे असे काही
अपवाद. सुनील निवृत्त होईपर्यंत त्याची जी फलंदाजी मी पाहिली, त्यात तो धावांचा सतत भुकेला होता.जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना त्याने भारतात, भारताबाहेर शास्त्रशुद्ध फलंदाजी करून घाम फोडला होता!
१९७४ मध्ये पुण्यात पश्चिम विभाग,वेस्ट इंडिज यांचा तीन दिवस सामना होता. क्लाइव्ह लॉईड,रिचर्ड्स, कालीचरण , ग्रीनिज, रॉबर्ट्स,ज्युलियन, होल्डर, किथ बोइस असे नामवंत खेळाडू होते.त्या सामन्यात सुनील त्या तोफखान्यासमोर मस्त खेळला.त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी मी पाहिली आहे.
याच वेळी नागपूर येथे त्याची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यावेळी त्याची पत्नी, एक वर्षाचा रोहन होते.१९८० मध्ये साताऱ्यात शाहू स्टेडियमवर टाटा, निरलॉन संघात झालेल्या सामन्यात सुनील आणि चेतन चौहान,संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रामनाथ पारकर, पद्माकर शिवलकर यांना जवळून पाहायला मिळाले.त्या नंतर दहा वर्षांनी त्याची भेट साताऱ्यात झाली. रॅमसन कलर लॅबचे
उद्घाटन आणि सातारा नगरपरिषद येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात मी पाहिले.मी पत्रकार कक्षात बसलो होतो.पण त्याने व्यासपीठावरून मला ओळखले नि ‘भेटूया ‘ अशी खूण केली.ही त्याची तिसरी भेट. त्याची भेट जेवढी आवडली तसेच त्याच्यावर खूप काही लिहिता आले याचा आनंद मोठा आहे.
क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर सुनील समीक्षक म्हणून काम करतोय.तो स्पष्टवक्ता आहे.त्यामुळे काही जण नाराज होतात.पण आयुष्यभर सरळ बॅटने खेळणारा सुनील त्यांच्याकडे लक्ष देत नाही.आज ७५ वर्षांची नाबाद खेळी करणारा सुनील शंभरी पूर्ण करेल अशी आशा करून त्याला शुभेच्छा देऊया.
-शरद महाजनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!