श्रीराम नानल सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव
सातारा
नवी मुंबई, ठाणे तसेच जुन्या गिरण गावातील जी सातारकर मंडळी आहेत, त्यांची आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान अशी संस्था कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे या प्रतिष्ठानचा भव्य दसरा मेळावा नुकताच परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी विश्वगुरू नामदेव महाराज हरड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वार्षिक मेळाव्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा *सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्याचे निवृत्त अग्रणी बँक अधिकारी, अर्थविषयक अभ्यासक आणि साहित्य प्रेमी श्रीराम नानल यांना सातारा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विश्वगुरू नामदेव महाराज हरड यांचे शुभहस्ते श्रीराम नानल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब निकम, उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने, खजिनदार संजय यादव, शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, महेश पवार, प्रकाश निपाणे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीराम नानल यांनी जिल्ह्यात अग्रणी बँक अधिकारी म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील बचत गट चळवळीची उभारणी केली व महिला सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.2012 मध्ये निवृत्तीनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी एम रामास्वामी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा पायाभूत सुविधांचा विशेष आराखडा तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. ऑगस्ट 2014 नंतर सातारा जिल्ह्यासाठी महाराष्ट्र बँकेसाठी जनधन योजनेचे सल्लागार या नात्याने एका वर्षात 60000 नवीन बचत खाती उघडून घेतली. राष्ट्रीय जीवन उन्नती अभियान या अंतर्गत मुख्य प्रशिक्षक या नात्याने सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके गोळा करून जिल्ह्यातील 23 वाचनालयांना सुमारे 3000 पुस्तके भेट दिली.
घरच्या मंडळींनीच पुरस्कार दिल्यामुळे आपला हुरूप वाढला आहे असे श्री नानल म्हणाले.
नानासाहेब निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अधिकाधिक सातारकरांनी प्रतिष्ठानचे सभासद व्हावे असे आवाहन केले. पसायदान झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
मुंबई व नवी मुंबई परिसरातील सातारकर रहिवासी मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित होते.
फोटो ओळ
विश्वगुरू नामदेव महाराज हरड श्रीराम नानल यांना सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित करताना, समवेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब निकम व अन्य पदाधिकारी

