पाठकजींचा यावर्षी साहित्य संमेलन विशेष ज्ञानगणेश
सातारा
‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘वारली गणेश’, ‘श्रीराम गणेश’, ‘काव्य-चित्र गणेश’ अशा संकल्पनांवर आधारित असलेल्या घरगुती गणेशासमोरील सजावटीनंतर सलग दहाव्या वर्षी पद्माकर पाठकजी आणि कुटुंबीय, खण आळी, सातारा यांनी यंदा ‘ज्ञानगणेश साहित्य संमेलन विशेष’ ही सजावट साकारली आहे.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी साताऱ्यात होणार आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मध्यवर्ती संकल्पना आम्ही घेतली आहे. ग्रंथदिंडी, साहित्य संमेलन मंडप, पुस्तकांचे स्टॉल असलेली ग्रंथनगरी, कविकट्टा आणि इतर विविध परिसंवादाची व्यासपीठे यांचे लघुरूप साकारले आहे. आतापर्यंत झालेल्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या छायाचित्रांचे संकलनही करण्यात आले आहे. साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्यामुळे साताऱ्यातील प्रमुख लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, साताऱ्यातील लेखक-कवींची यादी, साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनांमधील अध्यक्षांचे विचार, साहित्य संमेलनावरील पुस्तकांची मुखपृष्ठे आदी गोष्टीही सजावटीमध्ये मांडण्यात आल्या असून, संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे आणि संमेलनानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेचे संकल्पचित्रही साकारले आहे.

ही ‘साहित्य संमेलन नगरी’ साताऱ्यातील ज्येष्ठ कलाशिक्षक शेखर हसबनीस आणि त्यांची कन्या श्वेता जंगम हसबनीस यांच्या प्रयत्नांतून साकारली आहे, तर ऋत्विज कुंभार यांनी विशेष सहकार्य केले आहे. ९८ संमेलनाध्यक्षांच्या छायाचित्रांच्या संकलनाचे अतिशय आव्हानात्मक काम साताऱ्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार नरेंद्र जाधव यांनी केले आहे. साहित्यिक आणि इतर संदर्भांसाठी श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या सेवकवर्गाचे सहकार्य लाभले असून, चंद्रकांत चिंचकर आणि सारंग किरपेकर यांनी स्मरणिकेचे संकल्पचित्र आणि ‘डीटीपी’ साह्य केले आहे. संमेलनविषयक पुस्तकांसाठी पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर आणि डोंबिवलीचे ज्येष्ठ लेखक-समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांची मोलाची मदत झाली आहे. कलेची, बुद्धीची देवता असलेल्या ज्ञानगणेशाची ही पूजा अविश्रांत प्रयत्नांतून साकारली आहे. हा सारा खटाटोप प्रत्यक्ष पाहण्यासाठी ‘इये संमेलनाचिये नगरी’त येण्याचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण पद्माकर पाठकजी आणि कुटुंबीय, यांनी दिले आहे

