फुलांचे जंगली प्रदेश पुस्तकाचे प्रकाशन


सातारा
येथील आय एम ए सभागृहात ता. 9 जुलै रोजी ऍड सीमंतिनी नूलकर यांच्या दिलिपराज प्रकाशनतातर्फ़े प्रकाशित करण्यात आलेल्या “फुलांचे जंगली प्रदेश” या सहाव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन प्रोफेसर डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्ष, विद्यापरिषद-मराठी अभ्यास मंडळ(सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे),ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉक्टर देवानंद सोनटक्के,डॉक्टर रूपाली अभ्यंकर आणि म. सा. प. कार्यवाह मा.श्री. शिरीष चिटणीस यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक सीमंतिनी नूलकर यांना पश्चिम घाट,हिमालय,सिक्कीम,लदाख परिसरात, आणि विदेशात भटकंती दरम्यान जे रानफुलांचे बहर अनुभवायला मिळाले त्यासंबंधीचं पुस्तक आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक मा.डॉ.श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभली आहे.
यावेळी बोलताना श्री शिरीष चिटणीस म्हणाले की या पुस्तकामुळे अभिजात मराठी भाषेचा, निसर्गाचा परिचय नवीन पिढीला होईल. संस्कृती, संस्कार साहित्य असे सर्व या पुस्तकात आहे.या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्लिश मधे भाषांतर होणे आवश्यक आहे. हे पुस्तक जागतिक स्तरावर पोचले पाहिजे. हे पुस्तक चिरंतन मूल्यवान साहित्य प्रकारात मोडते.चिरंतन मूल्यवान साहित्य जगातील सर्व काळात सुसंस्कृत व सद्भिरुची असलेल्या समाजाच्या आकर्षणाचा विषय असतो.
यावेळी बोलताना डॉ देवानंद सोनटक्के यांनी प्रतिभा आणि संवेदनशीलता असल्याशिवाय असे लेखन निर्माण होऊ शकत नसल्याचे सांगितले. संपूर्ण लेखनात लेखिकेचं भारतीय मन जागं असल्याचा अनुभव येतो आणि हे पुस्तक दुर्गाबाई भागवत आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या लेखनाच्या दरम्यानचे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये लोककथा, लोकगीत, चिजांपासून अनेक अपरिचित वनस्पतीं, आदिवासी जनजातींच्या संवर्धन संकल्पना पर्यंत , प्राचीन भारतीय साहित्यापासून जागतिक साहित्यातल्या दिग्गजांपर्यंतचे साहित्यिक संदर्भ आहेत याचा उल्लेख केला. या पुस्तकाचे लेखन म्हणजे सौंदर्य आणि संस्कृतीचा घेतलेला शोध आहे.

Advertisement

भारतीय ज्ञान परंपरेची बीज या पुस्तकात दिसतात असे डॉक्टर संदीप सांगळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. हे पुस्तक मराठी साहित्याला वेगळे वळण देणारे आहे.सहसा साहित्यामध्ये मानवी भावभावना जीवन यांचे दर्शन असते.परंतु या पुस्तकात लेखिकेने निसर्गाला बोलते केले आहे. मराठी साहित्यात हे पुस्तक निश्चितच कौतुकाचा विषय ठरेल. या पुस्तकाच्या निमित्ताने अतिशय संवेदनशील दृष्टिकोन असलेलं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला सापडले आहे.संपूर्ण विश्वाची भटकंती, निसर्गाच्या माध्यमातून लेखिकेने या पुस्तकात करवून आणलेली आहे. या पुस्तकांने साहित्यामध्ये अतिशय मोलाची भर घातलेली आहे मराठी अभिजात भाषेला पोषक असे लेखन आहे.

या कार्यक्रमासाठी डॉक्टर रूपाली अभ्यंकर यांनी पुस्तकातील काही उताऱ्यांचे अभिवाचन केले त्यानंतर लेखिकेने मनोगत व्यक्त केले आणि रानफुलांविषयीचा रानस्नान हा स्लाईड शो दाखवला.कल्याणी थत्ते यांनी लेखिकेसाठी भावपूर्ण कविता सदर केली.
या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!