संतांच्या लेखणीने सामाजिक समता जोपासली
भक्तीरंग कार्यक्रमात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण
सातारा
एकीकडे राजकीय पातळीवर सामाजिक विघटनाचे काम सुरू असताना महाराष्ट्रातील संतांनी मात्र आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक समता जोपासण्याचे काम केले आहे आणि हे काम गेले अनेक शतके अविरतपणे सुरू आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले.
आषाढी एकादशीचे औचित्यसाधून खास भक्तीगीत व अभंगाचा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सप्तसूर ग्रुपतर्फे दीपलक्ष्मी सांस्कृतिक हाॅल येथे आयोजित केला होता तेव्हा ते बोलत होते
यावेळी प्रमुख पाहुणे शिरिष चिटणीस, रविंद्र खांडेकर यांची उपस्थिती होती.
मुकुंद फडके पुढे म्हणाले लहान वयात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांची निर्मिती करून संत ज्ञानेश्वर यांनी पुढील पिढ्यांसाठी एका मार्गदर्शकाची सोय केली आहे. कोणत्याही समस्येचे समाधान ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमध्ये सापडू शकते. समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा दासबोधाच्या माध्यमातून जीवन कसे जगावे हे याचा वस्तुपाठ घालून दिला.संत तुकाराम यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सारखे अभंग लिहून पर्यावरणाचाही संदेश दिला.
आधुनिक काळामध्ये विविध जात समूहांनी आपापले महापुरुष वाटून घेतले असतानाच सर्व जाती-धर्मांच्या संतांनी मात्र अत्यंत आदर्शपणे सामाजिक समता जोपासली आहे याचा आदर्श राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी घेणे गरजेचे आहे असे मुकुंद फडके यावेळी म्हणाले
यावेळी गायक कलाकार माधवी माने, कैलास मोहिते, चेतन गुरव,प्रशांत मोरे, अजय जगताप सतीश बोतालजी आणि शिरिष चिटणीस यांनी विविध भक्तिगीते सादर केली.
यावेळी जानवी दुधगी या 12 वर्षीय मुलीने व्हायोलिन वादन अत्यंत सुरेखपणे वाजवीत व्हायोलिनवर अभंग सादर केले तिला तबला वादक प्रज्वल जाधव यांची साथ लाभली .
माधव मेंडीगरी यांनी सूत्रसंचालन केले
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली
फोटो ओळ
दीपप्रज्वलन करताना शिरिष चिटणीस, शेजारी मुकुंद फडके, रविंद्र खांडेकर आणि सप्तसुर ग्रुपचे कलाकार

