राजकीय जनमानस हळूहळू बदलाच्या दिशेने : बाबुराव शिंदे


काँग्रेस भवनात प्रेमलाकाकी चव्हाण यांना अभिवादन
सातारा
कमालीचे वैविध्य असणाऱ्या खंडप्राय भारताला एकसंघ ठेवत सर्व समाज घटकांना प्रगतीकडे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो ,हे आता अनुभवाअंती भारतीय समाज मनाला कळू लागले आहे. राजकीय जनमानस हळूहळू बदलाच्या दिशेने जात आहे असे प्रतिपादन बाबुराव शिंदे यांनी केले.
येथील काँग्रेस भवनात माजी प्रदेशाध्यक्ष प्रेमलाकाकी चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण या राजकीय दाम्पत्याच्या स्मृति दिनानिमित आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.
प्रेमलाकाकी आणि आनंदराव चव्हाण यांच्या राजकीय कार्य कर्तृत्वाचा सुरुवातीला धावता आढावा घेऊन श्री.शिंदे यांनी सांगितले, की आणीबाणीनंतर काँग्रेस विभाजित होत असताना प्रेमलाकाकींनी महाराष्ट्रात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले. पुढील काळात यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशातील जनमानस ओळखून या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. आज आणीबाणीच्या निर्णयाआडून इंदिरा गांधींची अवघी कर्तबगारी झाकोळून टाकण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.
लोकल बोर्ड ते संसद व्हाया विधान परिषद, असा आनंदराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय कर्तृत्व नव्या पिढीपुढे येणे गरजेचे आहे ,असे स्पष्ट करून श्री शिंदे म्हणाले, महिलांनी राजकारणात सक्रिय होताना प्रेमलाकाकींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि तडफेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायला हवा. अन्य खेळांप्रमाणे महिला देखील क्रिकेटमध्ये पुढे यायला हव्यात, यासाठी त्यांनी प्रयत्न करत भारतात सर्वप्रथम महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. तरुण पिढीपुढे आज या साऱ्यांचे आदर्श जाणीवपूर्वक पुढे आणायला हवेत.
सुरुवातीला प्रेमलाकाकींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अँड .दत्तात्रय धनावडे यांनी स्वागत – प्रास्ताविक केले.
अभिवादन सभेस खजिनदार बाबासाहेब कदम, अन्वर पाशाखान, सुषमा राजेघोरपडे, मालिनीताई परळकर, मनोज कुमार तपासे ,राजेंद्र जाधव लक्ष्मण जाधव, सुरेश इंगवले आदी उपस्थित होते.

Advertisement

छायाचित्र ओळ

काँग्रेस भवनात मंगळवारी प्रेमलाकाकींच्या प्रतिमेला अभिवादन प्रसंगी बाबासाहेब कदम ,बाबुराव शिंदे, दत्तात्रय धनावडे आदी..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!