अनेकांच्या मार्गदर्शनामुळे लेखक म्हणून घडलो
लेखक राजेंद्र घाडगे यांनी उलगडला आपला लेखनाचा प्रवास
सातारा
ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आणि बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही वेळोवेळी मिळालेल्या चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे मी लेखक म्हणून घडलो आणि विकसित होत गेलो असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक इतिहास अभ्यासक राजेंद्र घाडगे यांनी केले
येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांनी आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर विजयराव नलावडे उपस्थित होते
व्यासपीठावर आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री, समन्वयक श्रीराम नानल आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस होते.
राजेंद्र घाडगे म्हणाले, कवितेच्या माध्यमातून माझ्या लेखन प्रवासाची सुरुवात झाली. कारकिर्दीच्या उत्तरार्धात मी इतिहास लेखनाकडे वळलो.या कालावधीमध्ये कवी संगीतकार यशवंत देव,ज्येष्ठ लेखक जयसिंगराव पवार,समीक्षक शंकर सारडा, डॉ.आ.ह.साळुंखे अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे माझी कारकीर्द घडत गेली.
यावेळी डॉक्टर राजेंद्र घाडगे यांनी ऐतिहासिक लिखाण करण्यासाठी कराव्या लागलेला परिश्रमांचेही वर्णन केले.ऐतिहासिक कागदपत्रे किंवा पुरावे गोळा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातही जावे लागले असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राजेंद्र घाडगे यांनी आपल्या कवितासंग्रहातील काही कवितांचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विजयराव नलवडे यांनी राजेंद्र घाडगे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना आगामी कालावधीमध्ये त्यांच्याकडून अधिक लेखन अपेक्षित असल्याचे सांगितले. लेखकाला प्रतिष्ठा मिळवून देणारा आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचा हा लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रम अत्यंत आदर्श असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी आम्ही पुस्तकप्रेमी समूहाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
ऍड सीमंतिनी नुलकर यांच्या हस्ते यावेळी राजेंद्र घाडगे यांचा सत्कार करण्यात आला
सातारा येथील रविंद्र शिवदे यांना पुणे येथील संस्थेकडून कालिदास सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मुकुंद फडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंजली शिवदेही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम नानल यांनी केले
आभार प्रदर्शन शिरिष शिटणीस यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर मोहन सुखटणकर,ऍड सीमंतिनी नुलकर ,डॉक्टर आदिती काळमेख, सविता कारंजकर, गौतम भोसले आणि इतर साहित्य प्रेमी उपस्थित होते
फोटो ओळ
राजेंद्र घाडगे यांचा सत्कार करताना ऍड सीमंतिनी नुलकर,शेजारी डॉक्टर संदीप श्रोत्री, डॉक्टर विजयराव नलवडे, शिरीष चिटणीस श्रीराम नानल

