जनवाचक चळवळ म्हणजे ज्ञानाची पणती घरोघरी
मेढा येथे पुस्तकभेट प्रसंगी श्रीराम नानल यांचे उद्गार
सातारा
जनवाचक चळवळ ही ज्ञानाची पणती घरोघरी लावण्याचा एक प्रयत्न आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचे सहाय्य मिळत आहे. असे उद्गार जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी मेढा येथे महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात पुस्तके देताना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे हे होते.
26 जानेवारी 1969 रोजी कैलासवासी डॉक्टर वा. सी. थत्ते यांच्या प्रेरणेने महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता या वाचनालयाला अ वर्ग मिळाला आहे .
वाचनालयाचे महत्त्व विशद करताना श्रीराम नानल पुढे म्हणाले की वाचनालय हे ज्ञान आणि विचाराचे केंद्र असते. ग्रामीण भागातील मुलांसाठी आणि तरुणांसाठी वाचनालये ही वरदान ठरतात. ती त्यांना जगाशी जोडतात आणि त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे साधन बनतात.
सुरेश पार्टे म्हणाले की जनवाचक चळवळी सारखे उपक्रम लोकांना पुन्हा पुस्तकांकडे आणण्याचे काम करतात. जनवाचक चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची जिद्द आहे असे उद्गार सहसमन्वय किरण गाडे यांनी काढले.
वाचनालयाला दिलेली पुस्तके महाबळेश्वर येथील डॉक्टर सुनिला मोहन रेड्डी यांनी चळवळीला दिली. त्यांना या जनवाचक चळवळीची माहिती सातारा येथील प्रसिद्ध कर सल्लागार उदयन गोडबोले यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमास वाचनालयाचे विश्वस्त नारायणराव शिंगटे, अशोक दीक्षित व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो ओळ
फोटोमध्ये डावीकडून सुरेश पार्टे,किरण गाडे, नारायण शिंगटे,अशोक दिक्षित, श्रीराम नानल, विठ्ठल देशपांडे

