मद्यधुंद कारचालकाने अनेकांना उडवले
कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार
कोल्हापूर
कोल्हापूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.एका मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार अनुभवायला मिळाला आहे. महाद्वार रोडच्या वन वेतून आत येत या मद्यधुंद कारचालकाने अनेक महिलांसह, भाविकांना धडक दिली आहे. तर काही दुचाकींना सुद्धा जोरदार धडक दिली आहे. कायम वर्दळीच्या ठिकाण असलेल्या महाद्वार रोडवर हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून या कार चालकाला रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशातच यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद कारचालकाची कपडे फाटेपर्यंत धुलाई केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जुना राजवाडा पोलिसांनी तपास केला असता मद्यधुंद कारचालक हा सांगलीचा असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे त्याचे नाव आहे. यावेळी प्रसाद सुतार याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

