नविन पिढीला साहित्याशी जोडणारे संमेलन ठरेल
विशेष लेख
राजधानी साताराला 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान महामंडळाने दिला त्याबद्दल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिता राजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि महामंडळाचे सगळे सदस्य यांचे समस्त सातारकर यांच्या वतीने अभिनंदन.
सातारा घडणारे हे चौथे साहित्य संमेलन
१९९३ साली यापूर्वीचे साहित्य संमेलन सातारा नगरीत पार पडले होते. त्याचे अध्यक्ष विद्याधर गोखले होते त्यावेळी शंकर सारडा सर यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली त्या संमेलनाची आखणी झाली होती आणि स्वागताध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले होते.
कोषाध्यक्षपदी शिरीष चिटणीस होते त्यांच बराच पुढाकार ९३ संमेलन सातारला घेण्यात होता .
एक लक्षात राहण्यासारखे साहित्य संमेलन म्हणून त्या संमेलनाकडे पाहिले गेले. व पु काळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले,बाबा महाराज सातारकर, राम शेवाळकर, शांताबाई शेळके, शिरीष पै असे कितीतरी मान्यवर साहित्यिक त्या संमेलनात वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थित होते.
ती एक साहित्यिक मेजवानी ठरली. प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी त्यावेळी त्यांची पहिली कविता मंचावर सादर केली होती .अशा अनेक सुंदर आठवणी त्या संमेलनाच्या आहेत. त्याच संमेलनात माझ्या स्मरणाप्रमाणे ‘ घर श्रीमंताचं ‘ नावाचे नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला गेला होता. त्यात सुधीर जोशी आणि आशा काळे असावेत.
एकंदरीत सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेल्यासारखे ते संमेलन पार पडले होते.
आता जवळजवळ 32 वर्षानंतर परत सातारा नगरीला तो बहुमान मसाप शाहूपुरी शाखा आणि त्या शाखेचे संस्थापक विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने पुन्हा प्राप्त झाला आहे. योगायोगाने यावेळी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
सातारा नगरीला ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर क्रांतीचा एक इतिहास ही आहे .सातारा जिल्हा अनेक दृष्टीने समृद्ध आहे त्यात पर्यावरण, पर्यटन, गड किल्ले यांचाही समावेश आहेच. समर्थाचा सज्जनगड आणि समर्थ साहित्य इथलेच .
त्याचबरोबर गेले काही वर्षात सातारा जिल्ह्यातले साहित्यिक वातावरणही समृद्ध आणि संपन्न झालेले आहे.
गेले जवळपास 25 वर्ष सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाने स्वतःची मोहोर साहित्य क्षेत्रात उमटवली आहे.
ग्रंथ महोत्सव म्हणजे ही एक छोटे साहित्य संमेलन असते पण त्यामुळे सातारा जिल्ह्यात एक साहित्यिक वातावरण निर्माण झाले आहे. पुस्तके वाचायची सवय लोकांना या ग्रंथ महत्वाने लावली म्हटले तरी अतिशय होऊ नये.
अनेक वेगवेगळ्या साहित्य संस्था ज्या सातारा जिल्ह्यात कार्यरत आहेत त्या त्यांच्या परीने साहित्यिक उपक्रम घेत असतात .त्यानिमित्ताने अनेक मोठमोठे साहित्यिक सातारा जिल्ह्यात येत असतात .खुद्द साताऱ्यात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर वाचनालय असू दे किंवा दीप लक्ष्मी पतसंस्था आणि पुस्तक प्रेमी ग्रुप असू दे त्याचबरोबर अश्वमेध ग्रंथालयासारखे एखादे छोटेखानी ग्रंथालयही असू दे प्रत्येक जण आपापल्या परीने साहित्य क्षेत्रात कार्य करत वाचन संस्कृती बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे.
मसाप शाहूपुरी शाखेने मर्ढेकरांचे स्मारक उभे केले त्यांच्या घराचे पुनर्जीवन केले. कवी मर्ढेकर नवकाव्याचे जनक मानले जातात. त्यांचे उत्तम स्मरण या प्रयत्नाने म सा प ने केले .
फलटण, वाई, रहिमतपूर कराड यासारख्या गावामध्ये सुद्धा अनेक चांगले उपक्रम सातत्याने घडत असतात.
रवींद्र बेडकीहाळ यांच्या प्रयत्नातून फलटणमध्ये मा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. हाही उपक्रम साहित्यिकांची ऊर्जा वाढवणारा आहे.
अनेक मान्यवर साहित्यिक सातारा जिल्ह्यात होऊन गेले. कवि गिरीश, वसंतराव कानेटकर,कवी यशवंत,बा सी मर्ढेकर यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे.
डॉ आ ह साळुंखे यांनी त्यांच्या सजग लेखनाने वैचारिक समृद्धी साहित्याला दिली आहे.
डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रध्देबाबत लढा उभा केला , पुस्तके लिहिली . माणसाला विज्ञान आणि विवेक याच्याशी जोडण्याचं काम त्यांनी केलं .
सध्याही साताऱ्यात अनेक साहित्यिक सातत्याने लिहित आहेत या पाठी या सगळ्याचा समृद्ध वारसा आहे.
मा यशवंतराव चव्हाण यांची साहित्य समृद्धी ही प्रेरणा देणारी आहे .
त्यामुळे हे घडणारे साहित्य संमेलन अनेक वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य देणारे घडेल.
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीची समृद्धी आणि संपन्नता लोकांसमोर मांडण्याबरोबर मराठी भाषा, मराठी बोली ,मराठी लोकसाहित्य ,मराठी लोकसंस्कृती या सगळ्यांना आणखीन सजग बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर या सगळ्याची नाळ नवीन पिढीशी जोडण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या संमेलनात घडतील अशी आशा धरायला हरकत नाही.
शेतकरी समस्या ,ग्रामीण भागातील समस्या, शोषणाच्या पाठीमागची मानसिकता, स्त्री जाणिवेची सखोलता आणि वेदना असे अनेक विषय समोर असू शकतात .त्याचबरोबर माध्यमं आणि त्यासमोरचे आव्हान आणि मराठी भाषा याचाही विचार यात घडेल.
नवीन पिढीला साहित्याची त्या पिढीच्या संवेदनेसहित जोडण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे .नवीन पिढीचे पाय साहित्य संमेलनाकडे वळावेत अशा पद्धतीच्या चर्चा घडणही गरजेचं आहे. हे संमेलन त्याबाबतीत सजगतेने विचार करेल कारण प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे नवीन पिढीशी असणारे आणि नवीन पिढीशी जोडले जाणारे विचार यांची संलग्नता चांगली आहे. महाराष्ट्रभरच्या नवीन साहित्यिकांशी ते जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या अनुरोधानं महाराष्ट्र साहित्य परिषद ही जोडली गेली आहे .हे या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
लेखिका संपादिका प्रकाशिका सुनीता राजे पवार आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी या दोघांची साथ प्राध्यापक मिलिंद जोशींना उत्तम प्रकारे आहे. साहित्य परिषदेचे झालेले परिवर्तन ही त्याची साक्ष आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अशा पार्श्वभूमीवर सातारा मधले संमेलन हे एक वेगळा विचार निर्माण करणारे समतावादी सर्वसामावेशक संमेलन ठरेल, ठरावे अशी सर्व साहित्य प्रेमींची इच्छा आहे .आणि ती पुरी होईल असा विश्वास ही आहे .
त्यासाठी या संमेलनाला सर्वांनी फक्त शुभेच्छा देऊन चालणार नाही तर सर्व सातारकरांनी या संमेलनाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून आपला सक्रिय सहभागी देणे गरजेचे आहे .
पुन्हा एकदा साहित्य महामंडळाच्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन. आणि खूपशा शुभेच्छाही .
डॉ राजेंद्र माने