सेलिब्रिटींच्या भेटीगाठीचे दृकश्राव्य कथन


डॉ श्रीनिवास नाटेकर यांच्या मांडणीने रसिक मंत्रमुग्ध

सातार
सांगली येथील प्रख्यात क्ष किरण तज्ञ डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्या आयुष्यात आलेल्या विविध सेलिब्रिटींच्या भेटीगाठीचे दृकश्राव्य कथन डॉक्टरांनी प्रभावीपणे सादर केले आणि रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले. येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे आयोजित ‘साहित्यिक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत भेटलेल्या विविध सेलिब्रिटींच्या भेटीच्या अनुभवाचे कथन केले.विद्यार्थी दशेत असताना ज्येष्ठ अभिनेता देवानंद यांच्यासोबत झालेली अनपेक्षित भेट असो किंवा डॉक्टर मित्राच्या क्लिनिकमध्ये अचानक पहायला मिळालेला मधुबाला हिचा एक्स-रे असो, या कथनाच्या माध्यमातून डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी तो काळ उभा केला. कॉलेजमधील वार्षिक समारंभामध्ये तलत मेहमूद यांनी डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्या आवडीचे गायलेले गाणे किंवा एकनाथ सोलकर यांची त्यांनी घेतलेली मुलाखत हे अनुभव ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले .गानकोकिळा लता मंगेशकर श्रीनिवास नाटेकर यांच्या क्लिनिकमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आल्या होत्या,तो प्रसंग डॉक्टरांनी अशाप्रकारे रंगवून सांगितला की रसिक भारावून गेले.सांगलीतील रक्तदान मोहिमेसाठी पु ल देशपांडे आले होते,तो प्रसंगही श्रोत्यांना वेगळा अनुभव देणारा ठरला.
सेलिब्रिटीच्या भेटीगाठीचा प्रसंग सांगत असताना त्याला योग्य अशा गाण्याची जोड दिल्यामुळे रसिकांना एक वेगळीच मेजवानी मिळाली.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी समूहाची माहिती दिली आणि या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कुपर कॉर्पोरेशनचे मानव संसाधन अधिकारी नितिन देशपांडे यांनी यावेळी या आगळ्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
डॉ संदीप श्रोत्री यांनी आभार मानले.
दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके,पद्माकर पाठकजी ,डॉक्टर प्रकाश जोशी डॉक्टर सुभाष आठल्ये, डॉक्टर शशिकांत पवार डॉक्टर गिरीश पेंढारकर,भास्क मेहेंदळे वेलणकर, रविंद्र शिंदे, डॉक्टर मोहन सुखटणकर उपस्थित होते

फोटो
डॉ श्रीनिवास नाटेकर यांचा सत्कार करताना नितीन देशपांडे,शेजारी माधवी नाटेकर,विनोद कुलकर्णी, डॉ संदीप श्रोत्री, शिरिष चिटणीस, श्रीराम नानल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!