जयवंत दळवी यांच्या साहित्यातील अस्पर्शीत प्रीतीचा शोध
डॉ निर्मोही फडके, योगेश केळकर, वंदना गुजरे यांचे सादरीकरण
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूह यांच्यातर्फे आयोजित एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये जयवंत दळवी यांच्या साहित्यातील अस्पर्शीत प्रीतीचा शोध घेण्यात आला
दीपलक्ष्मी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या संकल्पक डॉक्टर निर्मोही फडके, कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि अभिवाचक योगेश केळकर आणि अभिवाचक वंदना गुजरे यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यातील अस्पर्शीत प्रीतीचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतींचे सादरीकरण केले.
निर्मोही फडके यांनी या कार्यक्रमाचे विवेचन करताना या कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आल्याची त्यांनी सांगितले. यावेळी प्रथम वंदना गुजरे यांनी जयवंत दळवी यांच्या रुक्मिणी या कथेचे साभिनय अभिवाचन केले. त्यानंतर योगेश केळकर यांनी जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या त्या दोघी या ललित लेखाचे साभिनय अभिवाचन केले. अखेरच्या भागात योगेश केळकर आणि वंदना गुजरे या दोघांनी मिळून संध्याछाया या नाटकातील चार छोटे प्रवेश सादर करून प्रेक्षकांना नि:शब्द केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले.शिरिष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपली पतसंस्था नेहमीच पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद फडके यांनी केले. त्यांनी यावेळी थोडक्यात जयवंत दळवी यांच्या साहित्य कारकीर्दीचा आढावा घेतला.सुनील शेडगे यांनी आभार मानले.
यावेळी श्रीराम नानल, पद्माकर पाठकजी, मोहन सुखटणकर,सीमंतिनी नुलकर,डॉक्टर स्वाती श्रोत्री आणि मान्यवर उपस्थित होते
फोटो ओळ
कार्यक्रम सादर करताना वंदना गुजरे,योगेश केळकर,डॉ निर्मोही फडके

