समर्थ मंदिर परिसरात पिकअप शेड आवश्यक


एस.टी.च्या प्रतीक्षेत प्रवासी रस्त्यावर.
. सातारा
समर्थ मंदिर परिसरात प्रवाशांसाठी पिकअप शेडची उभारणी न केल्याने या ठिकाणी प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी तसेच कास बामणोली परिसरातून सातारा शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिकअप शेडअभावी नाहक त्रास सहन करावा लागतो. औषधोपचार तसेच आठवड्याचा बाजार खरेदीसाठी व व्यवसायासाठी या परिसरातून हजारो लोक दररोज सातारा शहरात येत असतात. विशेषतः समर्थ मंदिर परिसरात झालेल्या सोयीसुविधामुळे या भागातील नागरिक या परिसरात मोठी गर्दी करतात. औषध उपचार व इतर सोयी या ठिकाणी झाल्याने हे नागरिक समर्थ मंदिर परिसरात खरेदीला प्राधान्यक्रम देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. औषधोपचार व बाजारहाट खरेदी केल्यानंतर पुन्हा गावाकडे जाण्यासाठी त्यांना समर्थ मंदिर परिसरात एस.टी.ची वाट पहावी लागते. या ठिकाणी पिकअप शेडची सोय नसल्याने या नागरिकांना भर उन्हात, पावसात रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. यामध्ये लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पिकअप शेडची उभारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे…
दळणवळणाच्या सुविधे अभावी ग्रामीण भागातील नागरिकांना एस.टी.च्या सुविधेवरच अवलंबून राहावे लागते. समर्थ मंदिर परिसरात या नागरिकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक रस्त्यावर उभे राहून एस.टी. ची वाट पाहत असतात. बोगद्या मार्गे तीव्र उताराचा रस्ता असल्याने अनेकदा या मार्गावरून येणारी वाहने हे वेगाने येतात त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर उभे असणारे प्रवाशांना अधिक धोका निर्माण होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी शेडची उभारणी व्हावी अशी मागणी श्रीरंग काटेकर यांनी केली आहे

Advertisement

फोटो: समर्थ मंदिर परिसरात एस.टी.ची वाट पाहत रस्त्यावर उभे असलेले ग्रामीण भागातील नागरिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!