प्रश्नांची समर्पक उत्तरे फक्त विज्ञानच देऊ शकते
लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांचे प्रतिपादन
सातारा
विज्ञान हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लहानपणापासूनच त्या विषयाशी अनुरूप वाचन मी करीत गेले. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे फक्त विज्ञानच देऊ शकते. म्हणून त्या विषयावर लिखाण करायला जास्त आवडते,असे प्रतिपादन डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांनी केले
. आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात त्या बोलत होत्या. डॉक्टर स्वाती श्रोत्री, डॉक्टर मेधा क्षीरसागर व गौरी वैद्य यांनी त्यांची मुलाखत घेतली व डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व श्रोत्यांसमोर उलगडले. डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर या प्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि गोफ जन्मांतरीचे, डॉक्टर म्हणून जगताना / जगवताना इत्यादी पुस्तकांच्या लेखिका म्हणून वाचकांना सुपरिचित आहेत. या तिघी मुलाखतकर्त्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
लहानपणी आईचे संस्कार झाले आणि वाचनाची दिशा बदलली असे त्यांनी सुरुवातीलाच नमूद केले आईने लायब्ररीतून पुस्तक आणून वाचायची सवय लावली. त्यातूनच माझ्यातली लेखिका जन्माला आली असे त्या म्हणाल्या. कराड मधील दीर्घकाळ वास्तव्याबद्दल आणि तेथील व्यावसायिक कारकिर्दीबद्दल मन मोकळे करताना त्या आनंदीत झाल्या. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, मुलांचे संगोपन करणारी आई आणि घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करणारी सून अशा भूमिका एकत्रितपणे करताना खूप समाधान मिळाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील थोर माणसे भेटल्यामुळे वाचनातील प्रगल्भता वाढत गेली असेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर ब्रह्मनाळकर म्हणाल्या, आहार किंवा डायट याबद्दल गैरसमजच भरपूर आहेत .त्यामुळे या विषयावर मी पुस्तक लिहिणार आहे.लवकरच ते वाचकांच्या हातात पडेल.
प्रारंभी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी डॉक्टर ब्रह्मनाळकर यांचे स्वागत केले. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविकात समूहाच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती उपस्थित श्रोत्यांना दिली. साधना व ग्रंथ वेध या मासिकात आम्ही पुस्तक प्रेमी समूहाबद्दल विस्तृत माहिती आल्याचे त्यांनी नमूद केले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी आपल्या मनोगतात दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अशा उपक्रमांना कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले. उपक्रम समन्वयक स्वाती राऊत यांचा डॉक्टर ब्रह्मनाळकर यांनी सत्कार केला. मुलाखत घेणाऱ्या डॉक्टर स्वाती श्रोत्री, डॉक्टर मेधा क्षीरसागर व व गौरी वैद्य यांचाही सत्कार करण्यात आला.
समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी आभार प्रदर्शन करताना कराडहून येऊन सातारकारांशी संवाद साधल्याबद्दल सौ सुलभा ब्रम्हनाळकर यांना धन्यवाद दिले. या मुलाखतीच्या कार्यक्रमास सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये डॉक्टर चित्रा दाभोळकर, डॉक्टर शैला दाभोळकर, डॉक्टर मुक्ता दाभोळकर, डॉक्टर मोहन सुखटणकर यांचा समावेश होता.
फोटो ओळ
डॉक्टर सुलभा ब्रम्हनाळकर यांच्याशी संवाद साधताना डॉक्टर स्वाती श्रोत्री, गौरी वैद्य आणि डॉक्टर मेघा क्षीरसागर

